सकाळीच का वाढतो हार्ट अटॅकचा धोका ?
कोणत्या लोकांसाठी सकाळची वेळ ठरते अधिक धोकादायक?
हृदयविकार टाळण्यासाठी सकाळची सुरुवात कशी करावी?
आजच्या तणावपूर्ण आणि धावपळीच्या जीवनशैलीमध्ये हृदयविकाराचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. पूर्वी वयस्कर लोकांमध्ये दिसणारा हा आजार आता तरुण व मध्यमवयीन लोकांमध्येही सर्रास पाहायला मिळतोय. खाण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव, सततचा मानसिक ताण आणि झोपेची कमी वेळ – हे सर्व घटक हृदयाच्या आरोग्यावर घातक परिणाम करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की दिवसातील काही तास हे हार्ट अटॅकसाठी विशेषतः धोकादायक ठरतात?
सकाळीच का वाढतो हार्ट अटॅकचा धोका?

कार्डियोलॉजिस्ट्सच्या मते, पहाटे ६ ते सकाळी १० या वेळेत हार्ट अटॅक होण्याचा धोका इतर वेळांच्या तुलनेत अधिक असतो. यामागे अनेक जैविक आणि हार्मोनल कारणं आहेत. झोपेतून जागं झाल्यावर आपल्या शरीरात कॉर्टिसोल व अॅड्रेनालाईन या तणाव वाढवणाऱ्या संप्रेरकांचे प्रमाण अचानक वाढते. यामुळे रक्तदाब उंचावतो, हृदयाची धडधड वाढते आणि रक्तात गाठी तयार होण्याची शक्यता वाढते – जे हार्ट अटॅकचे प्रमुख कारण ठरू शकते.
रक्तवाहिन्यांवर सकाळी अधिक ताण

सकाळी जागे झाल्यावर आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये कडकपणा जाणवतो. त्याचवेळी प्लेटलेट्स म्हणजे रक्तातील गाठी तयार करणाऱ्या पेशी अधिक सक्रिय होतात. हे दोन्ही घटक एकत्र आल्यावर हृदयाच्या रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण होण्याचा धोका वाढतो.

ज्यांना हाय बीपी, मधुमेह किंवा कोलेस्ट्रॉल आहे
सतत ताणाखाली राहणारे लोक
कमी झोप घेणारे आणि व्यायाम टाळणारे
नियमित औषध न घेणारे
धूम्रपान करणारे किंवा मद्यपान करणारे
हे लोक हार्ट अटॅकच्या उच्च जोखमीच्या गटात येतात आणि त्यांच्या दृष्टीने सकाळचे तास अधिक धोकादायक असतात.
हृदयाची काळजी कशी घ्याल?

- झोपेतून उठताना सावधगिरी बाळगा – एकदम उठून हालचाल न करता आधी काही मिनिटे स्थिर बसावं.
- पहाटे पाणी प्या – शरीरात हायड्रेशन राखल्यामुळे रक्त साकळण्याची शक्यता कमी होते.
- दीर्घ श्वास घ्या – डीप ब्रीदिंगने मानसिक तणाव कमी होतो आणि रक्तदाब स्थिर राहतो.
- नियमित औषधे घ्या – डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचे वेळेवर सेवन करा.
- निरोगी जीवनशैली अंगीकारा – संतुलित आहार, व्यायाम, चांगली झोप आणि तणाव नियंत्रण या गोष्टी कठोरपणे पाळा.
हार्ट अटॅक केवळ रात्री झोपेतच होत नाही, तर सकाळी उठताच त्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे सकाळच्या वेळेत विशेषतः शरीरावर ताण न आणता, सावधगिरीने दिवसाची सुरुवात करणं आवश्यक आहे. वेळेवर उपचार आणि योग्य सवयी यामुळे तुम्ही हृदयविकार टाळू शकता.
टीप: वरील माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. तुमच्या वैद्यकीय समस्यांसाठी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या. Deshkarya.com याची खात्री करत नाही, केवळ जनहितासाठी ही माहिती देत आहोत.