महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला जाणार आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प मांडणार आहेत.

हे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी ते २५ मार्च या कालावधीत होणार आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह सर्व पक्षांचे गटनेते उपस्थित होते.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर कोणतेही शासकीय कामकाज न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या पार्श्वभूमीवर, पहिल्या दिवशी विधानसभेत आणि विधान परिषदेत शोकप्रस्ताव मांडून तो संमत करण्यात येणार आहे. या वेळी प्रत्येक पक्षाच्या गटनेत्यांना तसेच तीन सदस्यांना सभागृहात आपली भूमिका मांडण्याची संधी दिली जाणार आहे.
राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा, आगामी वर्षासाठीची धोरणे आणि विकासकामांसाठीची तरतूद यावर यंदाच्या अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पाकडे सर्वसामान्य नागरिकांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.