भारतासह जगभरात हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. बदललेली जीवनशैली, असंतुलित आहार, अपुरी झोप आणि शारीरिक हालचालींचा अभाव ही यामागची प्रमुख कारणे मानली जात आहेत. विशेष म्हणजे, तज्ज्ञांच्या मते अनेक लोक सकाळी उठल्यानंतर काही अशा चुका करतात, ज्या हळूहळू हृदयाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतात.
हृदयविकाराचा झटका केवळ वृद्धांपुरता मर्यादित राहिलेला नसून, तरुण वयोगटातही त्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. पुरुषांसोबतच महिलांनाही हा धोका तितकाच आहे.

सकाळी उठल्यानंतर हालचाल न करणे ठरते धोक्याचे
आजच्या डिजिटल युगात सकाळी उठताच मोबाईल हातात घेण्याची सवय अनेकांना लागलेली आहे. झोपेतून उठल्यानंतर शरीर काही काळ निष्क्रिय अवस्थेत असते. अशावेळी लगेच हालचाल न करता दीर्घकाळ अंथरुणावरच पडून राहणे शरीरासाठी अपायकारक ठरू शकते.
तज्ज्ञ सांगतात की, झोपेतून उठल्यानंतर ५ ते १० मिनिटे हलक्या हालचाली करणे आवश्यक असते. मात्र, हालचाल न करता जास्त वेळ पडून राहिल्यास रक्ताभिसरणाची गती मंदावते. याचा थेट परिणाम हृदयावर ताण वाढवणारा ठरू शकतो.
इन्सुलिन रेझिस्टन्सचा धोका वाढतो
सकाळी शारीरिक हालचाल न केल्यास इन्सुलिन रेझिस्टन्सचा धोका वाढू शकतो. यामुळे शरीरातील साखरेचे नियंत्रण बिघडते. रक्तातील साखर वाढणे, पोटावर चरबी साचणे आणि वजन वाढणे या सगळ्या गोष्टी हृदयाच्या आरोग्यासाठी घातक ठरतात.
वाढलेले वजन, उच्च रक्तदाब आणि शरीरातील दाहक प्रक्रिया (Inflammation) यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढू शकते, असा इशारा तज्ज्ञ देतात.
सकाळी काय करणे आवश्यक?
हृदय निरोगी ठेवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर किमान ५ मिनिटे हलक्या शारीरिक हालचाली करणे फायदेशीर ठरते. यामध्ये
हलके स्ट्रेचिंग
मंद गतीने चालणे
दीर्घ श्वसनाचे व्यायाम
यांचा समावेश करता येतो. या सवयींमुळे रक्ताभिसरण सुधारते, मेटाबॉलिझम सक्रिय होतो आणि हृदयाच्या स्नायूंना आवश्यक ऑक्सिजन मिळतो.
जीवनशैलीत बदल हाच खरा उपाय
तिखट आणि तेलकट आहाराचे अति सेवन, सततचा तणाव, अपुरी झोप आणि व्यायामाचा अभाव यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेसे पाणी पिणे आणि योग्य झोप या गोष्टी अंगीकारणे गरजेचे आहे.
टीप: हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. कोणत्याही आजाराबाबत किंवा उपचाराबाबत निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.