Withdrawal Updates: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) सभासद यावर्षी एप्रिलमध्ये सादर होणाऱ्या एका नवीन मोबाइल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून यूपीआय (UPI) पेमेंट गेटवेचा वापर करून आपल्या पीएफचे पैसे थेट बँक खात्यात मिळवू शकणार आहेत.

एका वरिष्ठ सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार, कामगार मंत्रालय अशा एका प्रकल्पावर काम करत आहे, ज्याअंतर्गत ईपीएफचा एक निश्चित हिस्सा सुरक्षित ठेवला जाईल, तर मोठा हिस्सा युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच यूपीआयद्वारे बँक खात्यातून काढण्यासाठी उपलब्ध असेल.
ईपीएफओकडे बँकिंग परवाना नसल्यामुळं ते आपल्या सदस्यांना थेट ईपीएफ खात्यातून पैसे काढण्याची परवानगी देऊ शकत नाहीत, असं सूत्रांनी सांगितलं. तरीही, ईपीएफओच्या सेवा बँकांच्या बरोबरीच्या असाव्यात आणि सदस्यांना अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर सुविधा मिळाव्यात, अशी सरकारची इच्छा आहे.
नवीन मोबाइल ॲप आणि त्यातील सुविधा
ईपीएफओ लवकरच एक नवीन समर्पित मोबाइल ॲप सादर करणार आहे, ज्याद्वारे सदस्य यूपीआय गेटवेचा वापर करून पैसे काढण्यासोबतच पासबुक शिल्लक तपासण्यासारख्या इतर सेवांचा लाभ घेऊ शकतील. सध्या सदस्य आपल्या ईपीएफ खात्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) पोर्टल किंवा ‘उमंग’ ॲपचा वापर करतात.
या सेवा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध राहतीलच, पण नवीन ॲपमुळे ईपीएफओ ग्राहकांसाठी सेवांची पोहोच आणि वितरण अधिक सुधारेल. सभासद या मोबाइल ॲपद्वारे आपल्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यासाठी उपलब्ध असलेली पात्र ईपीएफ शिल्लक पाहू शकतील. व्यवहार पूर्ण करण्यासाठी त्यांना त्यांच्या लिंक केलेल्या यूपीआय पिनचा वापर करण्याची परवानगी दिली जाईल, ज्यामुळे बँक खात्यात सुरक्षितरित्या पैसे ट्रान्सफर करता येतील.
काय आहे अधिक माहिती?
मिळालेल्या माहितीनुसार, ईपीएफओ सध्या या नवीन सुविधेच्या चाचणीसाठी १०० डमी खात्यांवर ट्रायल करत आहे, जेणेकरून कोणतीही तांत्रिक त्रुटी दूर करता येईल आणि सिस्टमची कार्यक्षमता सुधारता येईल. सद्यस्थितीत सदस्यांना आपली ईपीएफ रक्कम काढण्यासाठी क्लेम दाखल करावा लागतो, जी एक वेळखाऊ प्रक्रिया आहे. मात्र, ऑटो-सेटलमेंट व्यवस्थेअंतर्गत कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय तीन दिवसांत क्लेम निकाली काढले जातात. या व्यवस्थेची मर्यादा नुकतीच एक लाख रुपयांवरून वाढवून पाच लाख रुपये करण्यात आली आहे.
आजारपण, शिक्षण, लग्न आणि गृहनिर्माण यांसारख्या कारणांसाठी ही सुविधा मोठ्या संख्येने सदस्यांना तीन दिवसांत पीएफची रक्कम उपलब्ध करून देते. ईपीएफओने आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांना त्वरित मदत मिळावी यासाठी कोविड-१९ महासाथीच्या काळात पहिल्यांदा ऑनलाइन ऑटो-सेटलमेंट प्रणाली सुरू केली होती.