Beed Crime : उपसरपंचाचा कारमध्ये मृतदेह, डोक्यात गोळी लागलेली; हत्येचा संशय

Spread the love

बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली आहे. गेवराई तालुक्यातील लुखा मसला येथील उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे (वय ३८) यांचा मृतदेह सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात गाडीमध्ये आढळला आहे. डोक्यात गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, हा मृत्यू आत्महत्या आहे की हत्या, याबाबत अद्याप निश्चित माहिती नाही.

घटनेमुळे खळबळ

गोविंद बर्गे यांचा मृतदेह गाडीमध्ये आढळल्याची माहिती मिळताच वैराग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये एक पिस्तूल देखील सापडले आहे. त्यामुळे प्राथमिक अंदाजाने त्यांनी गोळी झाडून स्वतःला संपवले असावे असा कयास लावला जातो. मात्र घटनास्थळावर पोलिसांना काही संशयास्पद बाबीही आढळल्या आहेत. त्यामुळे ही हत्या असू शकते, असे संकेत देखील तपासातून मिळत आहेत.

प्रेमसंबंधातून वाद?

गोविंद बर्गे हे प्लॉटिंगच्या व्यवसायात होते. व्यवसायात जम बसलेला असतानाच त्यांचा परिचय पारगाव तमाशातील नर्तिका पूजा गायकवाडशी झाला. या ओळखीचं नंतर प्रेमसंबंधात रूपांतर झालं. इतकंच नव्हे तर गोविंद यांनी तिला सोन्याचे नाणे आणि तब्बल पावणे दोन लाख रुपयांचा मोबाईल देखील दिल्याचं सांगितलं जातं.

मात्र, गेल्या काही दिवसांत त्यांच्यात मतभेद निर्माण झाले. या वितुष्टाचा निकाल लावण्यासाठीच गोविंद सोमवारी मध्यरात्री आपल्या कारने बार्शी तालुक्यातील सासुरे गावात गेला होता, अशी माहिती समोर आली आहे.

पोलिस तपास सुरू

गावकऱ्यांनी एका काळ्या रंगाच्या कारविषयी संशय व्यक्त केला. पोलिस घटनास्थळी पोहोचले असता, गाडीत गोविंद बर्गे मृतावस्थेत आढळले. गाडीतच पिस्तूल असल्याने प्रथमदर्शनी आत्महत्येचा संशय आहे. पण, मृतदेहाजवळील काही बाबी पाहता पोलिस हत्या झाली असण्याची शक्यताही नाकारत नाहीत.

या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल.

पूर्वीच्या घटनेची आठवण

याआधीच बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण राज्य हादरलं होतं. त्या घटनेचा धक्का अद्याप लोक विसरले नसतानाच गेवराईतील उपसरपंचाच्या मृत्यूने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

One thought on “Beed Crime : उपसरपंचाचा कारमध्ये मृतदेह, डोक्यात गोळी लागलेली; हत्येचा संशय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *