मोठी बातमी : रशियाने कॅन्सरवर मात करणारी लस तयार केल्याचा दावा, सर्व प्रीक्लिनिकल चाचण्या यशस्वी

Spread the love

कॅन्सरवर प्रभावी उपचार शोधण्याचा प्रयत्न जगभरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर रशियाकडून एक मोठी बातमी समोर आली आहे. रशियाच्या फेडरल मेडिकल अँड बायोलॉजिकल एजन्सी (FMBA) ने कॅन्सरविरोधी लस विकसित केल्याचा दावा केला आहे. ही लस विशेषतः कोलोरेक्टल कॅन्सर (कोलन कॅन्सर) साठी बनवण्यात आली आहे आणि तिच्या सर्व प्रीक्लिनिकल चाचण्या यशस्वी झाल्याचं सांगितलं जात आहे.

FMBA च्या प्रमुख वेरोनिका स्क्वोर्सोव्हा यांनी या लसीबाबतची घोषणा नुकत्याच पार पडलेल्या ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम (EEF) मध्ये केली. त्यांनी सांगितलं की, “ही संशोधनप्रक्रिया अनेक वर्षांपासून सुरू होती. मागील तीन वर्षे फक्त प्रीक्लिनिकल अभ्यासासाठी खर्च झाली. अखेर आता लस वापरासाठी तयार आहे. आम्ही केवळ सरकारच्या अधिकृत मंजुरीची वाट पाहत आहोत.”

लसीचे काय परिणाम दिसून आले?

या लसीने ट्यूमरचा आकार कमी होणं आणि त्याच्या वाढीचा वेग मंदावणं सिद्ध केलं आहे.

रुग्णांच्या जिवंत राहण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचेही अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

लसीची सुरक्षितता आणि वारंवार वापरानंतरही टिकून राहणारी परिणामकारकता सिद्ध झाल्याचे तज्ज्ञ सांगतात.

इतर कॅन्सरसाठीही लस विकसित करण्याचे प्रयत्न

कोलोरेक्टल कॅन्सर ही या लसीची पहिली टार्गेटेड दिशा असली तरी, संशोधकांचा दावा आहे की ब्रेन कॅन्सर (ग्लिओब्लास्टोमा) आणि डोळ्यातील ऑक्युलर मेलेनोमा यांसारख्या कॅन्सरसाठीही लसी विकसित करण्याचे संशोधन सुरू आहे. त्यामध्येही आशादायक प्रगती झाल्याचं सांगण्यात आलं.

ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये घोषणा

व्लादिवोस्तोक येथे 3 ते 6 सप्टेंबरदरम्यान दहावे ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम पार पडले. ‘The Far East: Cooperation for Peace and Prosperity’ या विषयावर झालेल्या या परिषदेत 75 देशांमधील 8,400 हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. याच व्यासपीठावर रशियाने या कॅन्सरविरोधी लसीची माहिती जगासमोर ठेवली.

जगभरातील रुग्ण आणि वैद्यकीय तज्ज्ञांसाठी ही निश्चितच मोठी बातमी आहे. मात्र, लस प्रत्यक्षात रुग्णांसाठी उपलब्ध होण्यासाठी अजून सरकारी मंजुरी आणि क्लिनिकल ट्रायल्सचे टप्पे बाकी आहेत. तरीही, कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराविरोधात लढाईत हा एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.

One thought on “मोठी बातमी : रशियाने कॅन्सरवर मात करणारी लस तयार केल्याचा दावा, सर्व प्रीक्लिनिकल चाचण्या यशस्वी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *