Manoj Jarange मुंबईकडे ; पोलिसांकडून 40 अटींचं पत्र हाती, आंदोलन शांततेतच करावं लागणार

Spread the love

29 ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर आमरण उपोषणाचा निर्धार कायम

शांततेत आंदोलन करा, मालमत्तेचे नुकसान झाल्यास भरपाईची जबाबदारी आयोजकांवर

मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गेल्या दीड वर्षांपासून सातत्याने आंदोलन छेडणारे मनोज जरांगे पाटील यांनी अखेर मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 29 ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा त्यांचा निर्धार आहे. मात्र, जालन्यातील अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघण्यापूर्वीच पोलिस प्रशासनाने जरांगे यांना तब्बल 40 अटींचं पत्र दिलं आहे. या अटींचं पालन करूनच त्यांना समर्थकांसह मुंबईकडे कूच करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

photo credit manoj jarange patil page

पोलिसांकडून लादलेल्या अटी

जालना पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून जरांगेंना या अटी देण्यात आल्या असून त्यात काही महत्त्वाच्या अटी अशा आहेत :

प्रवासादरम्यान कोणत्याही जातीविरुद्ध भडकावणारी घोषणा किंवा वक्तव्य करायचे नाही.

ठरवलेल्या मार्गानेच प्रवास करायचा; मार्गात अनावश्यक बदल करता येणार नाही.

मोर्चेकऱ्यांमुळे अॅम्ब्युलन्स, अग्निशमन दलाची वाहने किंवा वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये, याची खबरदारी आयोजकांनी घ्यावी.

आंदोलनादरम्यान सार्वजनिक वा खासगी मालमत्तेचे नुकसान झाल्यास भरपाई आंदोलनकर्त्यांना द्यावी लागेल.

कोणत्याही सहभागींकडे शस्त्र, काठी, तलवार, दगड वा इतर घातक वस्तू नसाव्यात.

मनोज जरांगे पाटलांची भूमिका

अटींचं पत्र मिळाल्यानंतर जरांगे म्हणाले,
“लोकशाहीत शांततेने आंदोलन करणं हा आमचा हक्क आहे. आमचे वकील न्यायालयात आपलं म्हणणं मांडतील. आम्हाला विश्वास आहे की न्यायदेवता आम्हाला न्याय देईल. 29 ऑगस्ट रोजी मी आझाद मैदानावर उपोषणाला बसणारच.”

त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडताना म्हटलं की,
“इंग्रजांच्या काळात लोक उपोषण करायचे, पण आजच्या सरकारमध्ये मात्र परवानगी मिळत नाही, हे दुर्दैव आहे. शिंदे समितीला मुदतवाढ मिळाली आहे पण काम काही होत नाही. तेरा महिने झाले तरी समिती अजून अभ्यासच करते.”

पोलिसांचा कडक बंदोबस्त

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर लोक मुंबईकडे रवाना होणार आहेत. अंदाजे 10 ते 12 हजार समर्थक अंतरवाली सराटी येथे जमले आहेत. यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आला असून पोलिस प्रशासन हायअलर्टवर आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांनीही जरांगे पाटलांची भेट घेतली. आझाद मैदानाकडे जाण्यासाठी मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी जरांगेंनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *