बांबूला उसाचा भाव मिळणार? नितीन गडकरींचे संकेत “Bamboo to Get Sugarcane Price”

Spread the love

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा कृषी आणि पर्यायी इंधन क्षेत्राला चालना देणारा मोठा संदेश; भविष्यात बांबूला उसाच्या तोडीचा भाव मिळू शकतो.

पुणे | भारताच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा वाटा 22-24 टक्क्यांच्या दरम्यान असून, कृषी क्षेत्राचा विकास झाल्याशिवाय देश विकसित होऊ शकत नाही, असे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. ते सोमवारी पुण्यात प्राज इंडस्ट्रीजच्या वतीने आयोजित ‘बायोहॉर्स’ कार्यक्रमात बोलत होते.

Photo Credit Nitin Gadkari FB Page
Photo Credit Nitin Gadkari FB Page

या वेळी प्राज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, किर्लोस्कर ब्रदर्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय किर्लोस्कर, लष्कर मोटर्सचे एक्रम गुलाटी, हिरो मोटरचे विक्रम कसबेकर, विश्वास सोनी, अतुल मुळे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात डॉ. चौधरी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते झाले.

गडकरी म्हणाले, “देशात दरवर्षी तब्बल 22 लाख कोटी रुपयांचे जीवाश्म इंधन आयात केले जाते. यापैकी 40 टक्के प्रदूषण हे वाहनांमुळे होते. लोकसंख्या आणि वाहनांची वाढ लक्षात घेता प्रदूषणाचा आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. पर्यायी इंधनाचा वापर पर्यावरण आणि आरोग्य या दोन्ही दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की, इथेनॉल उत्पादनामुळे मक्याचे उत्पादन आणि उत्पादकांचे उत्पन्न वाढले आहे. टाकाऊ शेतमालापासून बायो-CNG निर्मिती होत असून, त्यामुळे टाकाऊ मालालाही किंमत मिळत आहे. पुणे–मुंबई महामार्गावर हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रकचा प्रायोगिक प्रकल्प राबवला जात आहे.

गडकरी यांनी ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेत जैवइंधनाचा पैसा गेल्यास गावं स्मार्ट होऊ लागतात, असे सांगितले. नागरिकांना NHAI च्या रोख्यांवर 8.5 टक्के व्याज मिळणार असून, ते दरमहा खात्यात जमा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विशेष म्हणजे, देशातील 17 टक्के पडीक जमिनीवर बांबू लागवड केली पाहिजे, असे गडकरी यांनी सुचवले. बांबू कार्बन डायऑक्साइड शोषतो, त्याचे उष्मांक मूल्य कोळशापेक्षा जास्त आहे आणि त्यापासून इथेनॉल तयार करता येते. “भविष्यात उसाप्रमाणेच बांबूला देखील चांगला बाजारभाव मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डॉ. प्रमोद चौधरी यांनी शाश्वततेला प्राधान्य देऊन, जैवतंत्रज्ञान क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यासाठी सर्व भागीदारांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.

2 thoughts on “बांबूला उसाचा भाव मिळणार? नितीन गडकरींचे संकेत “Bamboo to Get Sugarcane Price”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *