Maharashtra Police Bharti 2025: पोलीस भरतीच्या तयारीला लागा! १५ हजार पदं भरण्याचा महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

Spread the love

राज्य मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय, पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या युवकांना दिलासा

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घोषणेनंतर अखेर भरती प्रक्रियेला हिरवा कंदील

१५ सप्टेंबरला होणार मैदानी चाचणी, तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी संधी

महाराष्ट्रातील पोलीस भरतीची वाट पाहणाऱ्या हजारो युवकांसाठी राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत पोलीस दलातील तब्बल १५ हजार पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


मुख्यमंत्री फडणवीस यांची पूर्वघोषणा

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३,५६० रिक्त पोलिस पदे भरण्याची घोषणा केली होती. त्यापूर्वीच, जून महिन्यात पोलीस महासंचालकांनी सुमारे १० हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला होता आणि १५ सप्टेंबर रोजी मैदानी चाचणी होणार असल्याचे सांगितले होते. मात्र, भरती प्रक्रिया वेळेत सुरू न झाल्यामुळे विद्यार्थी समन्वय समितीने नाराजी व्यक्त केली होती.


चार मोठे निर्णय

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत खालील चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले:

  1. महाराष्ट्र पोलीस दलात सुमारे १५ हजार भरतीस मंजुरी
  2. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ
  3. सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवासासाठी Viability Gap Funding निधी मंजूर
  4. सामाजिक न्याय विभागाच्या कर्ज योजनेतील जामीनदार अटी शिथिल, शासन हमीस पाच वर्षांची मुदतवाढ

राजकीय घडामोडींची पार्श्वभूमी

आजच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित होते. जम्मू-काश्मीर दौऱ्यावरून परतल्यानंतर ते उपस्थित राहतील अशी अपेक्षा होती, मात्र त्यांचा मुक्काम लांबल्याने ते हजर राहिले नाहीत. रायगड व नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून नाराजी असल्याच्या चर्चा देखील रंगल्या. शिवसेनेचे (शिंदे गट) मंत्री भरत गोगावले देखील बैठकीला अनुपस्थित राहिल्याचे वृत्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *