Teacher News राज्यात उद्या जाहीर असलेल्या ‘शाळा बंद’ आंदोलनाच्या एक दिवस आधीच टीईटीचा (Teachers Eligibility Test) प्रश्न लोकसभेत पोहोचला. शिवसेना (शिंदे गट) चे खासदार धैर्यशील माने यांनी गुरुवारी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली.
माने यांनी स्पष्ट केले की, देशभरातील २५ लाख शिक्षकांचे भविष्य टीईटीवर अवलंबून आहे. शिक्षण हक्क कायदा लागू झाल्यानंतर टीईटी बंधनकारक करण्यात आली. ५३ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या शिक्षकांना ही परीक्षा द्यावीच लागेल, असा निर्णय केंद्राने घेतला.
“या शिक्षकांनी आपल्या-आपल्या भागातील आवश्यक पात्रता पूर्ण करून नोकरी मिळवली आहे. आता परीक्षा न पास झाल्यास त्यांना बडतर्फ करण्याची वेळ येणार आहे. हा अन्याय आहे,” असे माने म्हणाले.
टीईटीसह इतर मागण्यांसाठी राज्यातील अनेक शिक्षक संघटनांनी ५ डिसेंबरला शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. शिक्षण विभागाने आंदोलनावर कारवाईचा इशारा दिला असला तरी संघटना अडून राहिल्या आहेत.
टीईटीचा प्रश्न संसदेत उठल्यानंतर शिक्षकांमध्ये अपेक्षा वाढल्या आहेत. केंद्र सरकारने जर कोर्टात भूमिका घेतली तर हजारो शिक्षकांची नोकरी वाचण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.