बीड / गेवराई नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक आरोप त्यांच्या स्वीय सहाय्यक अमृत डावकर यांनी केला आहे. अचानक टोळक्याने हल्ला करून गंभीर मारहाण झाल्याचे सांगत डावकरांनी माध्यमांपुढे आरोप मांडले. या प्रकरणाने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
मंगळवारी पवार आणि पंडित गटात अचानक वाद उफाळल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली. त्याच दरम्यान, एक टोळका कृष्णाई बंगल्यावर धडकला. या ठिकाणी उपस्थित असलेल्या अमृत डावकर यांच्यावर बेल्ट, लाथा आणि दांडक्यांनी हल्ला करण्यात आला. यात त्यांच्या डाव्या डोळ्याला गंभीर इजा झाली असून हात, पाठीसह शरीरावर जखमा आहेत. सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
डावकरांचा आरोप आहे की, माजी आमदारांचे भाऊ इतर सहा जणांसह बंगल्यावर धडकले. वाहन घराबाहेर उभे असलेल्या कारला धडकवून आवाज निर्माण केला. आवाज ऐकून बाहेर आल्यानंतर, “अमरसिंह पंडित यांना संपवायचंच” असे टोळक्यातील लोक म्हणत असल्याचे डावकरांनी सांगितले.
“अमरसिंह पंडित इथे नाहीत तर तुला संपवू,” असा धमकीचा आवाज ऐकू आला, असा डावकरांचा आरोप.
ज्या व्यक्तींनी हा हल्ला केला, त्यातील एकावर पूर्वी ततालुका शिवसेना प्रमुखाच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली होती, असा दावा डावकरांनी केला. शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतरही त्याच्याकडून अशीच गुंड प्रवृत्ती दिसत असल्याचा सूर त्यांनी धरला.