माजलगाव धरणातून विसर्ग वाढ; सिंधफणा नदीपात्रात 5952 क्युसेक पाण्याचा विसर्ग

Spread the love

माजलगाव :
माजलगाव धरण परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा परिणाम धरणातील पाणी साठ्यावर होत असून, धरणाची पातळी नियंत्रीत ठेवण्यासाठी प्रशासनाने धरणातील पाण्याचा विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेतलेला आहे

शनिवार, दि. 13 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 9 वाजता माजलगाव प्रकल्पाच्या वक्रद्वार क्रमांक 6 आणि 16 हे प्रत्येकी 0.50 मीटरने वाढविण्यात आले. त्यामुळे सध्या धरणाच्या सांडव्यावरील एकूण तीन वक्रद्वार – क्रमांक 11, 6 व 16 हे अर्धा मीटरने उघडे ठेवण्यात आले असून, त्यातून सिंधफणा नदीपात्रात 5952.09 क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे.

धरण क्षेत्रात सतत पाणी येत असल्याने आवक आणि जावक यावर लक्ष ठेवून पुढील विसर्ग कमी-जास्त करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रकल्प प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, विसर्ग वाढल्यामुळे सिंधफणा आणि गोदावरी नदीकाठावरील तसेच पुराचा धोका निर्माण होणाऱ्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी नदीपात्राजवळ न जाता सुरक्षित स्थळी रहावे, असे आवाहन पूरनियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *