आष्टी मतदार संघातील विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी जिल्हाधिकारींचे निर्देश

Spread the love

बीड :
आष्टी मतदार संघातील विविध महत्त्वाच्या विकास प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकी मध्ये जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सर्व विभागीय अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देत विकासकामे जलद गतीने पूर्ण करण्यावर भर दिला.

Collector Office page

बैठकीला आमदार सुरेश धस, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रभोदय मुळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे, अधिक्षक अभियंता श्री. शिंगाडे, कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी, उपविभागीय अधिकारी बीड कविता जाधव, उपविभागीय अधिकारी पाटोदा वशिमा शेख, वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल गरकल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Collector office page

अपूर्ण भूसंपादन तातडीने पूर्ण करण्याचे आदेश

बैठकीत सिंचन, रस्ते, वनीकरण आणि भूसंपादन या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी अपूर्ण असलेल्या भूसंपादन प्रकरणांना तातडीने मार्गी लावण्याचे आदेश दिले. त्यांनी स्पष्ट केले की, हे प्रकल्प स्थानिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असून त्यासाठी विभागांनी वेळेत प्रस्ताव तयार करून मंजुरी मिळवावी आणि कामे पूर्ण करावीत.

आमदार सुरेश धस यांचा आग्रह

आमदार सुरेश धस यांनी आष्टी, पाटोदा आणि शिरुर (का.) मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामांना गती देण्याची मागणी केली. “काही प्रकल्पांमध्ये तांत्रिक किंवा प्रशासकीय अडचणी असल्यास जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने सोडवाव्यात,” असे ते म्हणाले. त्यांनी सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्यास शेतकऱ्यांना पाणी व्यवस्थापनात मोठा फायदा होणार असून त्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल, असेही नमूद केले.

बैठकीत चर्चिलेले महत्त्वाचे विषय

कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना क्र. 03 अंतर्गत खुंटेफळ साठवण तलावासाठी भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करणे

सिंदफणा मध्यम प्रकल्पाची उंची वाढवणे आणि त्यासाठी अतिरिक्त भूसंपादन

सिंदफणा व्हॅली अंतर्गत मदमापुरी, उखळवाड, पांगरी साठवण तलावांसाठी प्रलंबित भूसंपादन

महसूल, जिल्हा परिषद आणि वन विभागाच्या ताब्यातील जमिनी नगरपंचायतींना हस्तांतरित करण्याची प्रक्रिया

नायगाव मयूर अभयारण्यात गॅरीसिडिया वृक्षांचे उच्चाटन करून देशी औषधी व वनवृक्षांची लागवड

पैठण–पंढरपूर रा.मा. 272 ई. प्रकल्पातील थांबलेली कामे सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना मावेजा वाटप

शिरुर कासार तालुक्यातील विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाईच्या तक्रारींचे निराकरण

निमगाव मायंबा ग्रामपंचायतीतील लमाण तांडा क्र. 01 आणि 02 यांना स्वतंत्र महसूली सजा देण्याचा प्रस्ताव

पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील पवन ऊर्जा प्रकल्पासाठी घेतलेल्या जमिनींचे पुनर्स्थापना प्रश्न

श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड, सावरगाव घाट येथील देवस्थान परिसराच्या विकासासंबंधी मुद्दे

नागरिकांची उपस्थिती

या बैठकीस मोठ्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली होती. नागरिकांनी मांडलेल्या तक्रारींवरही अधिकाऱ्यांनी लक्ष घालून तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *