मुंबई :
ईद-ए-मिलाद (Eid E Milad 2025) या सणाची सुट्टी यंदा कोणत्या दिवशी राहणार याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला होता. अखेर महाराष्ट्र शासनाने याबाबतची अधिसूचना जारी करत नागरिकांची उत्सुकता संपवली आहे.
सामान्य प्रशासन विभागाने 3 सप्टेंबर 2025 रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार, मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यांसाठी ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी सोमवार, 8 सप्टेंबर 2025 रोजी राहील. मूळ नियोजनाप्रमाणे ही सुट्टी शुक्रवार, 5 सप्टेंबरला घोषित करण्यात आली होती. पण आता बदल करून ती सोमवारवर नेण्यात आली आहे.
मुस्लिम संघटनांची मागणी मान्य
या बदलामागे मुस्लिम संघटनांची मागणी कारणीभूत ठरली. 21 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत, 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असल्याने मोठ्या प्रमाणावर गणेश विसर्जनाची गर्दी होणार असल्याचे लक्षात घेऊन, जुलूस सोमवार, 8 सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलिस व प्रशासनावर ताण कमी करण्यासाठी हा निर्णय योग्य असल्याचे मान्य करण्यात आले.
या निर्णयामुळे मुंबईतील नागरिकांना सलग तीन दिवस सुट्टी मिळणार आहे. शनिवारी व रविवारी नियमित सुट्टी असल्याने त्यानंतर सोमवारची सार्वजनिक सुट्टी मिळणार आहे. त्यामुळे अनेक जण या दीर्घ वीकेंडचा फायदा घेऊन प्रवास, सहली किंवा कौटुंबिक कार्यक्रमाचे नियोजन करत आहेत.
इतर जिल्ह्यांमध्ये मात्र 5 सप्टेंबरलाच सुट्टी
महत्त्वाची बाब म्हणजे हा बदल फक्त मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांसाठी लागू आहे. राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये ईद-ए-मिलादची सुट्टी पूर्वी जाहीर केलेल्या तारखेनुसार म्हणजेच शुक्रवार, 5 सप्टेंबर 2025 रोजीच राहणार आहे. त्यामुळे राज्यातील इतर भागात त्या दिवशी शासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील.
प्रशासनाचा निर्णय सोयीस्कर
मुंबईसाठी सोमवारची सुट्टी ठेवण्याचा निर्णय प्रशासन आणि नागरिक या दोघांसाठीही सोयीस्कर ठरला आहे. गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलादचा जुलूस एकाच दिवशी आल्याने होणारी गर्दी व कायदा-सुव्यवस्थेचा ताण टाळण्यासाठी हा निर्णय योग्य ठरल्याचे मानले जात आहे.
एकंदरीत, ईद-ए-मिलाद 2025 साठी मुंबईकरांना 8 सप्टेंबरला सुट्टी मिळणार आहे, तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये मात्र ती सुट्टी 5 सप्टेंबरलाच राहील.