Beed Railway : बीडमध्ये अखेर रेल्वे धावणार – मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी ऐतिहासिक क्षण

Spread the love

बीडकरांसाठी अनेक दशकांपासूनचे स्वप्न आता साकार होण्याच्या मार्गावर आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी बीड–अहिल्यानगर रेल्वेसेवेचा शुभारंभ होणार असून, बीड शहर अधिकृतपणे रेल्वेच्या नकाशावर दाखल होणार आहे. या दिवशी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात येईल.

Photo Collector Office Beed Page FB

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृहात नुकतीच झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला महापारेषण कंपनीचे महाव्यवस्थापक संजीव कुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव दशपुते, वित्त विभागाच्या सचिव (वित्तीय सुधारणा) शैला ए, रेल्वे अधिकारी तसेच जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आदी मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार यांनी बैठकीदरम्यान बीड–परळी वैजनाथ रेल्वे मार्गावरील प्रलंबित भूसंपादनाच्या प्रकरणांना गती देण्याचे स्पष्ट निर्देश दिले. राज्य सरकारकडून प्रलंबित १५० कोटी रुपये तातडीने अदा करण्यास सांगितले असून, उर्वरित १५० कोटींची तरतूद लवकरच करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच रेल्वे प्रशासनाने दिलेल्या निधीच्या उपयोगिता प्रमाणपत्राच्या कार्यवाहीस गती देण्यावरही त्यांनी भर दिला.


बीड–अहिल्यानगर–परळी रेल्वे मार्गाचे तपशील

  • एकूण लांबी : २६१.२५ किमी
  • भूसंपादन : १८२२.१६८ हेक्टर
  • रेल्वे खालील पूल : १३०
  • रेल्वे वरील पूल : ६५
  • मोठे पूल : ६५
  • छोटे पूल : ३०२
  • प्रकल्प किंमत : ४८०५.१७ कोटी रुपये
  • निधी वाटा : केंद्र व राज्य सरकार प्रत्येकी ५०% (२४०२.५९ कोटी रुपये)

बीडकरांचे स्वप्न साकार

या रेल्वे प्रकल्पामुळे बीड जिल्ह्याला अखेर थेट रेल्वेसेवेचा लाभ मिळणार आहे. आतापर्यंत रेल्वे मार्गापासून वंचित असलेल्या या जिल्ह्याच्या नागरिकांना प्रवास, व्यापार, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वेसेवा सुरू झाल्याने बीड–अहिल्यानगर–परळी परिसरातील आर्थिक आणि सामाजिक विकासाला गती मिळेल.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनासारख्या ऐतिहासिक दिवशी बीडकरांना रेल्वेची भेट मिळणे ही एक अभिमानास्पद आणि भावनिक बाब ठरणार आहे. अनेक दशकांपासूनची प्रतीक्षा आता संपणार असून, रेल्वे धावताना पाहण्याचा क्षण बीडकरांसाठी इतिहासातील सुवर्णक्षण ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *