भरधाव कंटेनरची सहा पादचाऱ्यांना धडक; चौघे ठार, दोघे गंभीर

Spread the love

बीड जिल्ह्यात आज सकाळी घडलेल्या एका भीषण अपघाताने सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे. देवदर्शनासाठी पायी निघालेल्या सहा जणांना एका भरधाव कंटेनरने चिरडले. या धडकेत चौघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

ही घटना आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर, नामलगाव फाटा उड्डाणपुलाजवळ घडली. अपघात इतका भीषण होता की, मृत्यू झालेल्या व्यक्तींना जागेवरच मदतीची संधी मिळू शकली नाही. स्थानिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हे सर्वजण पेंडगाव येथे देवदर्शनासाठी जात होते. पण वाटेतच अचानक आलेल्या या कंटेनरने त्यांचा जीव घेतला. मृत आणि जखमींची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस अपघातग्रस्तांची ओळख पटविण्याचे काम करत आहेत.

या अपघातामुळे महामार्गावर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कंटेनर चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

गेल्या काही दिवसांत याच गढी उड्डाणपुलाजवळ अनेक अपघात झाले असून आतापर्यंत 5–6 जणांचा मृत्यू झाला आहे. सतत घडणाऱ्या या अपघातांमुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. नागरिकांनी या ठिकाणी वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षेची योग्य व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे पेंडगावसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. देवदर्शनाला निघालेल्या सहा जीवांपैकी चौघांचा रस्त्यातच अंत झाल्याने गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दिसत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *