माजलगाव धरण ९३ टक्के भरले; कुठल्याही क्षणी विसर्ग होण्याची शक्यता

Spread the love

माजलगाव │
दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ७ वाजेपर्यंत माजलगाव प्रकल्प धरणातील पाण्याची पातळी ४३१.५२ मीटर इतकी नोंदवली गेली. धरणाची एकूण साठवण क्षमता ४३१.८० मीटर असून सध्या केवळ ०.२८ मीटर एवढीच जागा रिकामी आहे. म्हणजे धरण फक्त एक ते सव्वा फूट एवढ्या पातळीवर भरायचे बाकी आहे.

धरणात आजवर ४३१.६० दशलक्ष घनमीटर (Mm³) पाणी साठले असून ही एकूण क्षमतेच्या सुमारे ९३ टक्के इतकी भर झाली आहे. यातील उपयुक्त पाणी साठा २८९.६० Mm³ इतका आहे. तसेच पाण्याचा विस्तार परिसरातील ७३.७६ चौ.कि.मी. पर्यंत पसरला आहे.

गेल्या दोन तासांत धरणात तब्बल २१,५८१ क्यूसेक वेगाने पाण्याची आवक झाली असून ४.४ Mm³ पाणी धरणात जमा झाले आहे. विशेष म्हणजे अद्याप धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झालेला नाही.

प्रकल्प प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाण्याची आवक सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत, कुठल्याही क्षणी धरणातून पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. धरणाखालच्या नदीकाठच्या गावांनी याबाबत सतर्क राहणे आणि खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्थानिक नागरिकांमध्येही धरण क्षमतेच्या शिखरावर पोहोचल्याची चर्चा सुरू असून, “धरण पूर्ण भरण्याच्या जवळ आले आहे. जर आवक अशाच वेगाने सुरू राहिली तर पाणी विसर्ग होण्याची शक्यता आहे अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *