मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्टला न्यायालयाने दिली एकदिवसीय सशर्त परवानगी
मुंबई | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठाम भूमिका घेणारे मनोज जरांगे पाटील येत्या २९ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. सुरुवातीला गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने आंदोलनास परवानगी नाकारली होती. मात्र आता, काही अटींच्या अधीन राहून मुंबई पोलिसांनी एकदिवसीय परवानगी दिली आहे.
उर्वरित वाहने शिवडी, कॉटनग्रीन परिसरात पार्क करावी लागतील.
गणेशोत्सवाच्या वाहतुकीस अडथळा येणार नाही याची दक्षता.
ध्वनीक्षेपक वा मोठ्या आवाजाच्या साधनांवर बंदी.
आंदोलनादरम्यान अन्न शिजवणे, कचरा टाकणे सक्त मनाई.
लहान मुले, गर्भवती स्त्रिया, वृद्ध व्यक्तींना आंदोलनात सहभागी न करण्याचा सल्ला.
भावनिक क्षण : औक्षणावेळी कुटुंबाच्या डोळ्यात पाणी
मनोज जरांगे पाटील जेव्हा आंदोलनासाठी निघाले, तेव्हा महाकाळा अंकुशनगर येथे त्यांच्या पत्नी, मुली व मुलगा शिवराज यांनी औक्षण केले. शिवराजने वडिलांच्या गळ्यात कवड्याच्या दोन माळा घातल्या. या वेळी त्यांच्या मुलींच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले. स्वतः जरांगे पाटलांच्याही डोळ्यांत पाणी दाटले, मात्र त्यांनी मुलांची समजूत काढली. “सरका, आम्हाला पाटलाला बघू द्या,” अशा आरोळ्या महिलांनी ठिकठिकाणी दिल्या.
अंतरवाली सराटीतून निघालेला मोर्चा धुळे-सोलापूर महामार्गावरून जात असताना “आरक्षण हक्क आमचा आहे” अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेले. गावोगावी लोकांनी स्वागतासाठी मंडप उभारले. महिलांनी आरत्या केल्या, मुलांनी फुलांचा वर्षाव केला.
महाकाळा अंकुशनगर येथे हजारो मराठा बांधव, महिला, बच्चे कंपनी उन्हात उभे राहून पाटलांची वाट पाहत होते. सकाळी साडेदहा वाजता निघालेला मोर्चा साडेचार तासांनी येथे पोहोचला. त्यानंतर तो शहागड- पैठण फाटा मार्गे मुंबईकडे रवाना झाला.
—
आंदोलकांची तयारी : महिनाभराची शिदोरी
या लढ्यासाठी मराठा बांधवांनी महिनाभराची शिदोरी बांधली आहे. अनेकांनी दोन महिन्यांचा किराणा, गॅस शेगडी, भांडी यासह आवश्यक साहित्य सोबत घेतले आहे. संपूर्ण जालना, परभणी, बीड जिल्ह्यातील युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगावमधून पाच टन पुऱ्या आंदोलनकर्त्यांसाठी पाठवण्यात आल्या आहेत. तसेच इतर गावांतूनही खाण्यापिण्याचा साठा मुंबईकडे रवाना झाला आहे.
—
मराठवाड्यातून कूच
गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्याच्या विविध भागातून हजारो समाजबांधव अंतरवाली सराटीत जमा झाले होते. अंबड शहरासह परिसरात त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. आता हे सर्व आंदोलक शेकडो वाहनांसह मुंबईकडे रवाना झाले आहेत.
—
मुंबईत स्वयंसेवकांची तयारी
आंदोलक मुंबईला पोहोचेपर्यंत मार्गावर ठिकठिकाणी पाणी, नाश्ता, जेवण आणि आरोग्याच्या सोयीसुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईत पोहोचल्यावर स्वयंसेवकांनी आंदोलकांच्या राहण्याची आणि जेवणाची तयारी केली आहे.
—
मोर्चाचा मार्ग आणि मुक्काम
मोर्चा जुन्नर, राजगुरूनगर, खेड, चाकण, तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूर मार्गे प्रवास करीत २८ ऑगस्टला मुंबईत आझाद मैदानावर दाखल होणार आहे. आज मोर्चाचा मुक्काम जुन्नर येथे असेल.
—
‘ही आरपारची लढाई’ – जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना संबोधित करताना सांगितले,
> “ही आरपारची शेवटची लढाई आहे. आरक्षण मिळेपर्यंत मुंबईतील आझाद मैदान सोडायचे नाही.”
त्यामुळे मराठवाड्यातून तसेच राज्यभरातून हजारो मराठा समाजबांधव या आंदोलनासाठी मुंबईकडे निघाले आहेत.
आता महाराष्ट्राचे डोळे २९ ऑगस्ट ला आझाद मैदानाकडे लागले आहेत.