महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा : मुंबई, रायगड, रत्नागिरीसह अनेक जिल्ह्यांना रेड व ऑरेंज अलर्ट

Spread the love

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून हवामान खात्याने पुढील काही तासांसाठी राज्यातील अनेक भागांना रेड व ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

पुढील १२ तासांचा अंदाज

मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी, पालघर, रायगड, पुणे घाट, नाशिक घाट आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे.

तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, गडचिरोली, धुळे, वर्धा, नागपूर, गोंदिया या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

पुढील २४ तासांचा अंदाज

रायगड आणि पुणे घाट या भागांना रेड अलर्ट जारी केला आहे.

तर रत्नागिरी, कोल्हापूर घाट, सातारा घाट, मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, नाशिक घाट आणि नंदुरबार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

समुद्र किनाऱ्यावरील धोका वाढला

समुद्र संशोधन संस्था (INCOIS) तर्फे मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि रत्नागिरी या किनारी जिल्ह्यांसाठी ३.५ ते ४.३ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्गसाठी हा अंदाज ३.३ ते ३.८ मीटर इतका आहे. या काळात समुद्राची स्थिती खवळलेली राहणार असून ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पूरस्थिती : नद्यांनी इशारा पातळी ओलांडली

रत्नागिरी जिल्ह्यात जगबुडी नदी धोका पातळी ओलांडली असून वाशिष्ठी, शास्त्री, काजळी, कोदवली व बावनदी या नद्याही वाढल्या आहेत.

रायगडमध्ये अंबा नदी धोक्यापेक्षा वर वाहते आहे, तसेच सावित्री व कुंडलिका नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे.

ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी जांभूळपाडा आणि बदलापूर येथे धोक्याची घंटा वाजवत असून, प्रशासन सतर्क आहे.

मुंबईतील मिठी नदीची पातळी ३.९ मीटरपर्यंत पोहोचल्यामुळे कुर्ल्यातील क्रांतीनगर भागातील सुमारे ३५० नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. सध्या नदीची पातळी ३.४ मीटर आहे.

बचाव कार्याचा आढावा

NDRF चे पथक पालघर जिल्ह्यातील मोरी गावात कार्यरत असून आतापर्यंत १२० पेक्षा अधिक नागरिकांचे स्थलांतर केले आहे. सावंतपाडा परिसरात आणखी ४४ लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.

SDRF चे पथक नांदेडच्या मुखेड तालुक्यात तैनात असून, आतापर्यंत २९३ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

ठाण्यातील ६१०, पालघरमधील ४९७ आणि रत्नागिरीतील ५ नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे.

वाहतुकीवर परिणाम

मध्य रेल्वे : सीएसएमटी ते ठाणे दरम्यान वाहतूक बंद; ठाणे पुढे गाड्या सुरू.

हार्बर मार्ग : सीएसएमटी ते मानखुर्द दरम्यान सेवा बंद; वाशी ते पनवेल गाड्या सुरू आहेत.

पश्चिम रेल्वे : वाहतूक सुरळीत सुरू आहे.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी BEST तर्फे जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत.

One thought on “महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा : मुंबई, रायगड, रत्नागिरीसह अनेक जिल्ह्यांना रेड व ऑरेंज अलर्ट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *