बीडमधील शेतकरी संकटात; केंद्राकडून मदतीचा हात द्या

Spread the love

खा.बजरंग सोनवणेंनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेवून केली मागणी

बीड:
बीड जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पाऊस जोरदार हजेरी लावत असून जिल्ह्यामधील बहुतेक सर्वच महसुल मंडळामधे अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. शेतातील पिके पाण्यात आहेत. दोन दिवसांपुर्वी खा.बजरंग सोनवणे यांनी थेट शेतात जावून नुकसानीची पाहणी केली होती. आज दि.१९ रोजी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची दिल्ली येथे भेट घेवून अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मदतीचा हा द्या, अशी मागणी खा.बजरंग सोनवणे यांनी केली.

बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांवर अतिवृष्टीमुळे मोठे संकट ओढावले आहे. राहती घरे, पीक, पशुधन, शेतीजमीन तसेच फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे.या नुकसानीची दखल घेऊन शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून तातडीने मदत मिळावी, यासाठी खा.सुप्रिया सुळे यांच्या सोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात संततधार आणि मुसळधार पावसाची नोंद झालेली असून जिल्ह्यातील नद्यांना पूर गेलेला आहे. नदीपात्रापासून एक किलोमीटर अंतरापर्यन्त पिके पाण्याखाली आहेत. पावसामुळे पिकांचे, शेतीचे आणि घरांची पडझड होवूनही मोठी हानी झालेली आहे. केज तालुक्यातील काही गावात मांजरा नदीच्या पात्रातील पाणी शिरले होते. या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे आणि शेतीचेही नुकसान झाले होते. यानंतर तातडीने खा.बजरंग सोनवणे यांनी पूर्वनियोजीत दौरा रद्द करून शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतात जावून पिकांची आणि नुकसानीची पाहणी केली होती. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांनी धीर दिला होता. यानंतर मुख्यमंत्री आणि कृषीमंत्री यांना निवेदन पाठवून पंचनामे करणे व मदतीची मागणी केली होती. आज दि.१९ रोजी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेवून केंद्र सरकारच्या वतीने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी केली. दरम्यान, गेल्या ४/५ दिवसांपासून झालेल्या संततधार पावसामुळे बीड जिल्ह्यामध्ये सर्वत्रच शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उपजाऊ मातीसह जमीन वाहून गेल्यामुळे पुढील काळासाठी काही क्षेत्र उजाड झाली आहेत. काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे तसेच गुरे दगावले असल्याची माहिती येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. झालेल्या नुकसानीचे फोटो व व्हिडिओ स्वत:कडे जतन करून ठेवावेत, तसेच नुकसानीबाबतची तक्रार फोटो, व्हीडिओसह तहसीलदार यांच्याकडे लेखी स्वरूपात सादर करावी. या प्रक्रियेत कुठलीही अडचण आल्यास माझ्या कार्यालयाशी संपर्क साधून मदत घ्यावी, असे अवाहनही खा.बजरंग सोनवणे यांनी जिल्ह्यातील शेतकरी व नागरिक यांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *