जिंतूर / मराठवाडा व विदर्भाला जोडणाऱ्या जिंतूर–सेनगाव मार्गावर पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे दुपारी बारा वाजल्यापासून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. येलदरी धरणा मधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यामुळे पूर्णा नदीला मोठा पूर आला आहे
पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी या धरणातून दुपारी बारा वाजता सर्व १० दरवाजे एक ते दीड मीटरने उघडण्यात आले. त्याद्वारे पूर्णा नदी पात्रात तब्बल ५३,३६०.५३ क्यूसेसने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्याचबरोबर येलदरी जलविद्युत केंद्राच्या गेटद्वारे देखील आणखी २७०० क्यूसेस पाणी सोडण्यात येत आहे.
सकाळपासून पाण्याचा विसर्ग सुरू
आज सकाळी ७.४५ वाजता धरणाचे सुरुवातीला सहा दरवाजे उघडण्यात आले व . त्यानंतर पाण्याची आवक सतत वाढत असल्यामुळे एकूण दहा दरवाजे ०.५ मीटरने उघडण्यात आले. सुरुवातीला २१,१०० क्यूसेस इतका विसर्ग नदीत सोडण्यात आला होता; मात्र दुपारी ही मात्रा वाढवण्यात आली.
धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस
येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाचा सिलसिला सुरू असल्याने. तसेच खडकपूर्णा धरणातूनही विसर्ग सुरू असल्याने येलदरीत जलाशयामध्ये जलसाठा झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळेच पाण्याचा विसर्ग आणखी वाढवावा लागला आहे. धरणात पाण्याची होणारी आवक लक्षात घेऊन पुढील काही तासांत विसर्ग कमी अथवा जास्त केला जाऊ शकतो, अशी माहिती पूर्णा पाटबंधारे प्रकल्प प्रशासनाने दिली आहे.
पूलाखालील वाहतूक ठप्प
येलदरी–सावळी–इटोली मार्गावरील तसेच हिवरखेड पुलावरून पाणी वाहू लागले आहे. परिणामी जिंतूर–सेनगाव या मुख्य मार्गावरील वाहतूक दुपारी बारा वाजल्यापासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मराठवाडा व विदर्भाला जोडणारा हा मुख्य रस्ता ठप्प झाला आहे, नागरिक व वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन देखील पाटबंधारे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पाटबंधारे प्रशासनाचा इशारा
पूर्णा नदी पात्रातील पाणी अचानक वाढल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीपात्रात न उतरता सुरक्षित ठिकाणी राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.