सर्वांच्या सहकार्याने बीड जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करुन चेहरा-मोहरा बदलणार
17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी
बीड-अहिल्यानगर’ रेल्वे सुरु होणार
बीड /
जिल्ह्याचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक अशा सर्व घटकांना प्रगतीची समान संधी देत आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण घडवून आणणार आहोत,” असा ठाम निर्धार उपमुख्यमंत्री व बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त व्यक्त केला.

- Weather Alert: या जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता ; 24 जिल्ह्यांना अलर्ट
- Central Government Alert केंद्रा कडून ; सर्व राज्यांना पत्र 20 दिवसांत ॲक्शन प्लॅन तयार करण्याचे आदेश
- ZP Election जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर ; कोणत्या जिल्ह्याला कोणतं आरक्षण?
- Weight Lose सकाळी करा ही ५ कामे; पोटाची चरबी कमी होईल
- Nano Banana AI वापरून काही मिनिटांत 3D फोटो कसा बनवायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ७९ व्या स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, आमदार विजयसिंह पंडित, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान यांच्यासह विविध अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय एकतेचा उत्सव”
उपमुख्यमंत्री पवार यांनी स्वातंत्र्यलढ्यात प्राणाची बाजी लावणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना अभिवादन केले.
“असंख्य ज्ञात-अज्ञात वीरांच्या त्यागातून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले आहे. देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता आणि लोकशाही मूल्ये अबाधित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. राष्ट्रविकासाच्या वाटचालीत प्रत्येक नागरिकाने आपला वाटा उचलायला हवा,” असे आवाहन त्यांनी केले.
मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा वारसा

मराठवाड्याच्या इतिहासाचा उल्लेख करताना पवार म्हणाले –
“देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले, मात्र निजामशाहीच्या जोखडातून मराठवाडा १७ सप्टेंबर १९४८ रोजी मुक्त झाला. स्वामी रामानंद तीर्थांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात गावोगावी जनता सहभागी झाली. बीडच्या विठ्ठलराव काटकर, काशिनाथ जाधव, हिरालाल कोटेचा यांसारख्या भूमीपुत्रांनी निजामाच्या सैन्याला जोरदार प्रतिकार केला. त्या लढ्यातील प्रत्येक बलिदान आजही आपल्याला प्रेरणा देतं.”
विकासकामांचा धडाका

उपमुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील सुरू असलेल्या आणि आगामी प्रकल्पांची माहिती दिली –
बीड-अहिल्यानगर रेल्वे मार्ग : १७ सप्टेंबर रोजी, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन.
बीड विमानतळ विकास प्रकल्प : जागा निश्चिती व प्राथमिक चाचण्यांसाठी निधी मंजूर.
सीट्रीपलआयटी (CTRIIT) तंत्रज्ञान प्रकल्प : टाटा टेक्नॉलॉजी व एमआयडीसीच्या सहकार्याने १९६.९८ कोटींचा उपक्रम, युवकांना कौशल्यविकासाची नवी दारे.
परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडा : सुधारित ३५१ कोटींना मान्यता.
श्री कंकालेश्वर मंदिर परिसराचा विकास, महसूल भवन, अत्याधुनिक ग्रंथालय व सहकार भवनाची उभारणी.
जिल्हा क्रीडा संकुलासाठी अतिरिक्त २५ कोटी – खेळाडूंना आधुनिक सुविधा व प्रशिक्षण केंद्र उपलब्ध होणार.
आरोग्य क्षेत्रातील मोठी झेप
अंबाजोगाई मेडिकल कॉलेज आणि बीड जिल्हा रुग्णालयासाठी मोठ्या प्रमाणात आधुनिकीकरणाची कामे हाती घेतली जाणार आहेत.
१०० खाटांचे कार्डियाक कॅथलॅब,
एमआरआय, डायलिसीस सेंटर,
माता-बाल संगोपन रुग्णालय,
तसेच असाध्य आजारांवर उपचार केंद्र अशी सुविधा बीडमध्येच उपलब्ध होणार आहे.
“या सेवांमुळे नागरिकांना उपचारासाठी जिल्ह्याबाहेर जावे लागणार नाही,” असे आश्वासन पवार यांनी दिले.
शेती, पशुधन व पर्यावरणपूरक उपक्रम
महाराष्ट्र शेतीप्रधान असल्याचे सांगून पवार म्हणाले –
“परळी येथे सुरू होणाऱ्या नवीन शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयामुळे पशुपालकांना आधुनिक सेवा मिळतील. राज्यात प्रशिक्षित पशुवैद्यकांची संख्या वाढेल.”
त्याचबरोबर ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ अभियानांतर्गत बीड जिल्ह्यात एका दिवसात ३० लाख झाडांची लागवड करून विक्रम प्रस्थापित करण्यात आला आहे. येत्या काळात एक कोटी झाडे लावण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
महिला व ग्रामीण सक्षमीकरण
‘लखपती दीदी’ योजना : बीड जिल्ह्यात महिलांनी राज्याच्या उद्दिष्टापेक्षा जास्त यश मिळवून व्यवसाय उभारला.
प्रधानमंत्री आवास योजना : २०२४-२५ मध्ये ९८% आणि २०२५-२६ मध्ये ९०% उद्दिष्टपूर्ती. हजारो कुटुंबांचे कायमस्वरूपी निवाऱ्याचे स्वप्न साकार.
रमाई आवास योजना : पाच हजारांहून अधिक घरांना मान्यता.
“हे सर्व प्रकल्प आणि उपक्रम बीडच्या विकासयात्रेची नवी सुरुवात आहेत. सर्व घटकांना सोबत घेऊन, लोकशाहीच्या बळावर, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने, शेती-उद्योग-शिक्षण-आरोग्य-पर्यावरण या क्षेत्रात बीडला प्रगत जिल्ह्यांच्या अग्रस्थानी आणायचे आहे,” असा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करून त्यांच्याशी संवाद साधला. या प्रसंगी जिल्ह्यातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.