INDIA आघाडीचा ‘मतचोरी बंद करा’ मोर्चा; संसद ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंतच्या मार्गावर पोलिसांनी रोखले

Spread the love

राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली INDIA आघाडीचा मोर्चा; 300 खासदार सहभागी

नवी दिल्ली — बिहारमधील मतदार यादीतील कथित अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली INDIA आघाडीने आज (सोमवार) निवडणूक आयोगावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. संसद भवनापासून निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत पायी मोर्चा नेण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र दिल्ली पोलिसांनी संसद परिसरातील मकर द्वार येथेच हा मोर्चा रोखला.

300 खासदारांचा मोर्चात सहभाग

सुमारे 300 विरोधी पक्षांचे खासदार या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. त्यांच्या हातात ‘सेव्ह व्होट’ व ‘मतचोरी थांबवा’ अशा घोषणा असलेले बॅनर होते. पोलिसांनी मात्र मोर्चासाठी परवानगी घेतलेली नसल्याने त्यांना पुढे जाण्यापासून रोखले.

राहुल गांधींचे नेतृत्व

काँग्रेस नेते राहुल गांधी हे मोर्चाच्या अग्रस्थानी होते. बिहारमधील मतदार पडताळणी प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत त्यांनी निवडणूक आयोगाकडे थेट कारवाईची मागणी केली. “लोकशाहीत मत हेच सर्वात मोठं शस्त्र आहे, त्याच्यावर डाका टाकण्याचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही,” असा त्यांचा संदेश होता.

संसदेतही गोंधळ

पावसाळी अधिवेशनाचा आज 16 वा दिवस असून, लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच विरोधी खासदारांनी घोषणाबाजी करत वेलमध्ये प्रवेश केला. “वी वॉन्ट जस्टिस” अशा घोषणा देत गदारोळ केल्याने सभापती ओम बिर्ला यांनी लोकसभा दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केली. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सांगितले, “आम्ही केवळ शिष्टमंडळाद्वारे नव्हे, तर सर्व खासदारांनी एकत्रितपणे निवडणूक आयोगाला निवेदन सादर करावे, ही आमची मागणी आहे.”

राज्यसभेत ‘मतचोरी थांबवा’च्या घोषणा

राज्यसभेतही शून्य प्रहरात विरोधकांनी घोषणाबाजी करत ‘मतचोरी थांबवा’च्या घोषणा दिल्या. काही खासदारांनी सभापतींच्या आसनाकडे जात आंदोलन केले. अखेर राज्यसभेचे कामकाज देखील दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

15 दिवसांत फक्त 2 दिवस चर्चा

21 जुलै रोजी सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनात आतापर्यंत 15 दिवस झाले असून फक्त 2 दिवसच अर्थपूर्ण चर्चा होऊ शकली आहे. विरोधी पक्ष दररोज बिहार मतदार पडताळणीच्या मुद्द्यावरून निषेध नोंदवत आहेत, तर सरकारकडून या आरोपांना नकार देण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *