५०० रुपयांच्या हुबेहुब नोटा जप्त
अहिल्यानगर तालुका पोलिसांनी बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ६० लाख ५० हजार रुपयांच्या बनावट नोटा आणि २ कोटी १६ लाख रुपयांच्या नोटा छापण्यासाठी वापरायचे कागद पोलिसांनी जप्त केले आहेत. सात जणांना अटक झाली असून एकजण फरार आहे.
पान टपरीवरून पोलिसांना मिळाला सुगावा
सगळं प्रकरण उघडकीस आलं ते आंबीलवाडी गावातल्या एका पान टपरीवरून. तिथे एका ग्राहकाने दिलेल्या नोटा संशयास्पद वाटल्यामुळे टपरी चालकाने थेट पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी लगेच तपास सुरू केला आणि दोन जणांना ताब्यात घेतलं. चौकशीतून पुढे बीड आणि संभाजीनगर या दोन ठिकाणांचं कनेक्शन समोर आलं.
संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसीत होता बनावट नोटांचा कारखाना
संशयितांची माहिती घेतल्यानंतर पोलिसांना समजलं की बनावट नोटा संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत एका गुप्त ठिकाणी तयार केल्या जात होत्या. पोलिसांनी तिथे धाड टाकून संपूर्ण साहित्य – प्रिंटर, कागद, रंग आणि इतर साधनं – जप्त केली. या छाप्यात ५०० रुपयांच्या हुबेहूब खऱ्यासारख्या दिसणाऱ्या नोटा सापडल्या.
या प्रकरणात खालील सात जणांना अटक झाली आहे:
निखिल गांगर्डे ,सोमनाथ शिंदे , प्रदीप कापरे ,मंगेश शिरसाट ,विनोद अरबट
,आकाश बनसोडे ,अनिल पवार
अंबादास ससाने हा मुख्य आरोपी फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या सगळ्यांची आधीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे.
५० हजारात मिळायच्या १ लाखाच्या बनावट नोटा!
या टोळीचा असा प्लॅन होता की बनावट नोटा आधी छापून घ्यायच्या, आणि मग त्या ५० हजार रुपयांमध्ये १ लाखाच्या नोटा वितरकांना द्यायच्या. त्यातूनच सर्वांनी चांगला नफा मिळवायचा. या नोटा छोट्या-मोठ्या दुकानांमध्ये, बाजारात आणि इतर व्यवहारांमध्ये सहज खपवल्या जात होत्या.
पोलीस अधीक्षकांचं आवाहन
या कारवाईबाबत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे म्हणाले,
“या प्रकारच्या बनावट नोटा गेल्या अनेक वर्षांपासून बाजारात फिरत आहेत. त्यामुळं बँका, व्यापारी आणि सामान्य नागरिकांनी सतर्क राहावं. काहीही संशयास्पद वाटलं तर ताबडतोब पोलिसांना कळवावं.”
अहिल्यानगर पोलिसांची ही कारवाई खरंच कौतुकास्पद आहे. बनावट नोटा ही फक्त एक फसवणूक नसून ती संपूर्ण अर्थव्यवस्थेला धक्का देणारी गोष्ट आहे. त्यामुळे सर्वांनी सजग राहायला हवं. तुमच्याही हाती काही संशयास्पद नोट लागल्या, तर लगेच पोलिसांशी संपर्क साधा.