वडवणी /
हरित क्रांतीचे प्रणेते, गरीब-शेतकऱ्यांचे तारणहार, आणि जनतेच्या हक्कांसाठी लढणारे कर्मयोगी व माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या १२२ व्या जयंतीनिमित्त आज वडवणी येथे गोर बंजारा समाजाच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास मंत्री इंद्रनील नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी वसंतराव नाईक यांना अभिवादन करताना, त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण निर्णयांची आठवण करून दिली गेली. त्यांनी राबवलेली हरित क्रांती, तांडा-वस्ती विकास योजना, शैक्षणिक व सामाजिक सुधारणा, तसेच “काम द्या, पाणी द्या” योजना आजही प्रेरणादायी ठरत असल्याचे वक्त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान समाज बांधवांनी विविध मागण्या मंत्री महोदयांसमोर मांडल्या. यात बीड जिल्ह्यात तांडा-वस्ती सुधार योजनेतून निधीच्या प्रभावी अंमलबजावणीची, घरकुल योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्याची, तसेच संत सेवालाल महाराज तांडा ग्रामपंचायतचे विभक्तीकरण प्रत्यक्षात राबवण्याची मागणी करण्यात आली. मंत्री इंद्रनील नाईक यांनी या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहून स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन दिले.
वसंतराव नाईक यांनी आपल्या कार्यकाळात भूसंपादन कायद्यात बदल करून गरीबांना जमिनीचे मालकी हक्क मिळवून दिले. महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहून (1963 ते 1975) त्यांनी शेतीप्रधान महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी अनेक परिवर्तनकारी धोरणे राबवली.