जगातील अग्रगण्य नाव असलेली व तंत्रज्ञानाने संपूर्ण कंपनी गुगल (Google) ही आता भारतात मोठ्या प्रमाणावर पाऊल टाकत आहे. आंध्रप्रदेश येथे राज्यातील विशाखापट्टणम शहरात गुगल कडून तब्बल ६ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यामध्ये १ गिगावॉट क्षमतेचं डेटा सेंटर आणि त्यासाठीची ऊर्जा पायाभूत सुविधा विकसित केली जाणार आहे.
या प्रकल्पासाठी २ अब्ज डॉलरची गुंतवणूक केवळ नवीकरणीय ऊर्जा निर्मितीसाठी केली जाणार असून, हे डेटा सेंटर पूर्णतः ग्रीन एनर्जीवर चालवण्याचा प्रयत्न राहणार आहे.
ही गुंतवणूक गुगलच्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या डेटा सेंटरपैकी एक ठरणार आहे. सिंगापूर, मलेशिया, थायलंडसारख्या देशांमध्येही गुगलने आपल्या डेटा सेंटर नेटवर्कचा विस्तार सुरू ठेवला आहे. यावर्षी एप्रिलमध्येच अल्फाबेटने (google मूळ कंपनी) ७५ अब्ज डॉलरची जागतिक पातळीवर डेटा सेंटर निर्मितीची घोषणा केली होती.
सध्या सिंगापूर दौऱ्यावर असलेले आंध्रप्रदेशचे IT मंत्री नारा लोकेश यांनी गुगल गुंतवणुकीवर थेट भाष्य केलं नाही, मात्र त्यांनी सांगितलं की, “Sify टेक्नोलॉजीजसारख्या कंपन्यांनी राज्यात ५५० मेगावॉट क्षमतेचं डेटा सेंटर उभारण्याचे जाहीर केले आहे. काही मोठ्या घोषणा ऑक्टोबर महिन्यात करण्यात येतील.”
आंध्र प्रदेश राज्याने आतापर्यंत १.६ गिगावॉट क्षमतेचे डेटा सेंटर प्रकल्प अंतिम केले असून, पुढील पाच वर्षांत ६ गिगावॉट क्षमतेचं नेटवर्क तयार करण्याचा निर्धार सरकारने केला आहे. यासाठी तीन केबल लँडिंग स्टेशन देखील विशाखापट्टणममध्ये उभारण्याची योजना आहे.
डेटा सेंटर चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर, सातत्यपूर्ण आणि विश्वासार्ह वीज लागते. त्यामुळे आंध्रप्रदेश सरकारने १० गिगावॉट क्षमतेची ऊर्जा व्यवस्था तयार करण्याचा संकल्प केला आहे.
“बहुतेक वीजनिर्मिती ही हरित (ग्रीन) ऊर्जा स्त्रोतांमधूनच होईल. मात्र काही अंशत: कोळशावर आधारित वीजनिर्मिती देखील आवश्यक असेल,” असं मंत्री लोकेश यांनी स्पष्ट केलं.
२०१४ मध्ये तेलंगणा राज्य वेगळं झाल्यानंतर आंध्रप्रदेशने आपली राजधानी हैदराबाद गमावली. त्यानंतर महसुलात घट आणि वाढलेला कर्जाचा भार हे मोठं आव्हान ठरले. त्यामुळेच राज्याने IT आणि डेटा क्षेत्रातील गुंतवणूक आकर्षित करण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे.
विशाखापट्टणमचा विकास आंतरराष्ट्रीय डेटा केंद्र म्हणून करून, दक्षिण भारतात एक वेगळा डिजिटल हब निर्माण करण्याची आंध्रप्रदेश सरकारची महत्त्वाकांक्षा आहे.