अजित पवारांसोबत सकारात्मक चर्चा, लवकरच औपचारिक सोहळा
बीड जिल्ह्यातील भाजप नेत्या व मंत्री पंकजा मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का ठरणारी राजकीय घडामोड समोर आली आहे. वडवणी तालुक्यातील ज्येष्ठ नेते राजाभाऊ मुंडे आणि त्यांचे पुत्र बाबरी मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गटात प्रवेश करण्याच्या अंतिम टप्प्यात आहेत. आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत यासंदर्भात सकारात्मक चर्चा पार पडली.

या चर्चेत माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके, सभापती महादेव तोंडे, आणि नगरसेवक सुधीरभाऊ ढोले देखील उपस्थित होते. हे तिन्ही नेतेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे
अजीतदादांचा बीड दौरा लवकरच नियोजित असून, त्यावेळी या नेत्यांच्या पक्षप्रवेश सोहळ्याचे औपचारिक आयोजन करण्यात येणार आहे.
🔹 35 वर्षांच्या नात्याला विराम
राजाभाऊ मुंडे हे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे अत्यंत जवळचे सहकारी होते. गेली ३५ वर्षे त्यांनी भाजपमध्ये सक्रिय भूमिका निभावली असून पंकजा मुंडेंच्या संघटनातही त्यांचं महत्वाचं स्थान होतं. वडवणी परिसरात त्यांचे प्रभावी नेतृत्व असून सहकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.
बाबरी मुंडे यांनी मागील विधानसभा निवडणुकीत माजलगावमधून बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी केली होती, त्यानंतर ते पुन्हा भाजपमध्ये सक्रिय दिसले नव्हते. आता वडवणीतील हे पिता-पुत्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याने भाजपला बीड जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे.
🔹 राष्ट्रवादीच्या गोटात नवसंजीवनी
या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला माजलगाव व वडवणी भागात नवी ताकद मिळणार आहे. विशेषतः प्रकाश सोळंके यांच्या पुढाकारामुळे हा राजकीय निर्णय आकाराला आल्याचे बोलले जात आहे.
या घडामोडींमुळे बीड जिल्ह्यातील राजकारणाला नवीन वळण मिळाले आहे. एकेकाळी पंकजा मुंडेंच्या खांद्याला खांदा लावून उभे असलेले नेते आता त्यांच्या विरोधात जाणार असल्याने भाजपमध्ये अस्वस्थता आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस मात्र आगामी निवडणुकीत हीच ताकद भांडवल म्हणून वापरण्याच्या तयारीत आहे.