“त्या दोनशे दिवसांत दोन वेळा मृत्यूच्या दारात गेलो”

Spread the love

“माझ्यावर आरोप झाले, पण संपूर्ण जात-परिवाराला बदनाम केलं; हीच खरी वेदना”

ठाण्यात वंजारी समाज अधिवेशनात धनंजय मुंडेंची भावूक प्रतिक्रिया

आज ठाणे येथे आयोजित वंजारी समाजाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात सामाजिक विचारमंथनासोबत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वंजारी समाजातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थितांना संबोधित करताना आपले मन मोकळे केले. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर तब्बल 200 दिवसांनी सार्वजनिक व्यासपीठावर भाष्य करताना ते भावूक झाले.

“माझा काहीही संबंध नसलेल्या प्रकरणावरून माझ्यावर सलग 200 दिवस मीडिया ट्रायल झाली. मी दोन वेळा मरता-मरता वाचलो. पण मी संयम बाळगला. मी कधी जात, जिल्हा, आईबाप, मुलांवर टीका केली नाही; मग माझ्यावर एवढा अन्याय का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

जात, द्वेष, आरोप… आणि संयम

धनंजय मुंडे म्हणाले, “मी कधीही जात पाहून काम केले नाही, ही शिकवण मला स्व. गोपीनाथ मुंडे साहेब आणि वडील स्व. पंडित अण्णा यांच्याकडून मिळाली आहे. जात हे कधीच कामाचं निकष नसावं – ही आमच्या रक्तातली शिकवण आहे. काही जणांनी आरोप केले, ते ही अशा विषयांवर ज्याच्याशी माझा दूर-दूरपर्यंत संबंध नव्हता. दोष असलेल्या व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे, हे मला मान्य आहे. पण त्यातून संपूर्ण समाज, कुटुंब, जिल्हा आणि जातीला दोषी ठरवणं दु:खद आहे.”

“माझ्यावर झालेले आरोप सहन केले, शांत राहिलो, कारण संघर्ष आमच्या घराण्यात परंपरेने आलेला आहे. टीका करा, पण जात-धर्म-आईबापावर नका आज जर संकटात असताना लोकांना धनंजय मुंडेंचा नंबर आठवतो, तर हेच माझं खरं यश आहे. मंत्रिपद हे प्रतिष्ठेचं असेल, पण त्यासाठी आत्मसन्मान गमावायचा नाही. मंत्रिपदाला काय चाटायचं आहे का?” असा रोखठोक सवालही त्यांनी केला.

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वंजारी समाजातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय कार्य करणारे निवृत्त प्रधान सचिव सुमंत भांगे यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. याशिवाय शैक्षणिक, प्रशासकीय, वैद्यकीय, सांस्कृतिक, क्रीडा, साहित्य, पत्रकारिता आदी क्षेत्रांतील ५० हून अधिक व्यक्तींना गौरविण्यात आले.

महत्त्वाचे सन्मानित व्यक्ती:
अशोकराव मोराळे, रणजित ढाकणे, ह.भ.प. डॉ. सुदाम पानेगावकर, डॉ. उज्वला दहिफळे, लेफ्टनंट प्रवीण सांगळे, एमपीएससी टॉपर धनंजय बांगर, स्मिता घुगे (एव्हरेस्ट सर), क्रिकेटर सचिन धस, साहित्यिक अलकनंदा घुगे, पत्रकार विलास बडे, आणि संस्कृती क्षेत्रातील श्रद्धाताई गित्ते आदींचा यामध्ये समावेश होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने होते. यावेळी आयोजकांनी मुंबई-पुणे आदी ठिकाणी स्पर्धा परीक्षा तयारीसाठी सामाजिक वसतीगृह, अभ्यासिका आणि सभागृहांची मागणी केली. यासंदर्भात समाज एकत्र येऊन प्रयत्न करेल, असे आश्वासनही धनंजय मुंडे यांनी दिले.