माजलगाव /
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार प्रकाश सोळंके यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे पक्षावर नाराजी व्यक्त करत थेट आरोप केला आहे की, “माझी जातच आड येते, त्यामुळेच मला मंत्रिपद मिळत नाही.” त्यांनी आपल्या वक्तव्यात मराठा समाजाची उपेक्षा होत असल्याचा ठपका ठेवत पक्षावर “मराठ्यांचा वापर आणि ओबीसीला प्राधान्य” दिल्याचा आरोप केला आहे.
प्रकाश सोळंके हे मागील पाच वेळा माजलगाव मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र, त्यांना आजपर्यंत मंत्रिपद मिळालेले नाही. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटले की,
> “बीड जिल्हा ओबीसीसाठी राखीव असल्यासारखीच भूमिका पक्षाची दिसते. बहुजन समाजाला येथे संधी द्यायचीच नाही, असा पक्षाचा दृष्टिकोन आहे. मी मराठा असल्यामुळेच मला मंत्रिपद मिळत नाही.”
शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वावर अप्रत्यक्ष टीका करत त्यांनी असेही सांगितले की,
> “राष्ट्रवादी काँग्रेसला बीड जिल्ह्यात टिकवून ठेवण्यात मराठा समाजाचा मोठा वाटा आहे. अनेक निवडणुकांमध्ये मराठ्यांनी पक्षाला भक्कम साथ दिली आहे. मात्र, सत्तेच्या वाटपात मात्र मराठा समाजाकडे दुर्लक्षच झाले.”
धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद मिळण्याच्या शक्यतेबाबतही सोळंके यांनी भाष्य केले.
> “धनंजय मुंडे आमचेच सहकारी आहेत. त्यांना क्लिन चीट मिळाली, त्याबाबत माझे मत पक्षश्रेष्ठींना सांगणार आहे. त्यांना शुभेच्छा!”
सोळंकेंच्या या वक्तव्यामुळे जिल्हा राजकारणात खळबळ निर्माण झाली आहे. मागील काही महिन्यांपासून नाराज असलेले सोळंके पुन्हा एकदा थेट वक्तव्यातून आपल्या भावना मांडताना दिसले.