तळकोकणात निवडणुकीचा धुरळा; शिवसेना-भाजप आमनेसामने, राणे बंधूंची रस्सीखेच तीव्र

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

तळकोकणातील राजकारण पुन्हा तापले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच शिवसेना-भाजप या सत्तेतील मित्रपक्षांचे ‘मैत्र’ कोकणात गळाले असून दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांचा थरार सुरू आहे. विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळकोकणात हे राजकीय पाहुणचार आता थेट रस्त्यावर उतरले आहे.

Amazon

Amazon App Player

Download Now

सिंधुदुर्गात दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढाईचा मार्ग स्वीकारला आहे. बुधवारी आमदार नीलेश राणे यांनी पोलिसांसह मालवणमधील भाजप कार्यकर्ते विजय किनवडेकर यांच्या घरी छापा टाकत लाखो रुपये निवडणुकीसाठी साठवण्यात आल्याचा आरोप केला. दुसऱ्याच दिवशी मंत्री नितेश राणे स्वतः किनवडेकर यांच्या घरी पोहोचले आणि त्यांना धीर देत या कारवाईचा निषेध केला.

माध्यमांशी बोलताना नितेश राणे म्हणाले, “प्रत्येकाचे स्वतःचे व्यवसाय असतात. व्यवसायासाठी पैसे घरात ठेवले तर त्यात गुन्हा काय? आमची बदनामी करण्याचा प्रयत्न होऊ नये. आम्हाला लागू होणारा नियम सर्वांनाच लागू झाला पाहिजे. ‘हमाम में सब नंगे हैं’,” असा अर्थपूर्ण टोला त्यांनी लगावला

नीलेश राणे यांनी या पैशांचा संबंध भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्या भेटीशी जोडत संशय व्यक्त केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना नितेश म्हणाले, “तो त्यांचा राजकीय आरोप आहे. चव्हाण प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांना प्रत्येक जिल्ह्यात जाणे भाग आहे. मग उदय सामंत का आले होते हेही विचारायला लागेल काय?”

महायुतीबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, “एकत्र लढायचे की नाही यावर बोलण्याची वेळ निघून गेलीय. आता निवडणुकीचा अंतिम टप्पा आहे. चर्चा विकासावर व्हायला हवी.”

याउलट नीलेश राणे पोलिस व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी ठामपणे पुढे नेत आहेत. “या पैशांचा स्रोत पुराव्यानिशी स्पष्ट करावा लागेल,” असे ते म्हणाले.

दरम्यान, स्वतःवर झालेले आरोप फेटाळताना विजय किनवडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, “हे पैसे माझ्या बांधकाम व्यवसायातील आणि मित्रांकडून घेतलेल्या देणी-घेणीतील आहेत. सर्व पुरावे मी देणार आहे. अनधिकृतपणे घरात प्रवेश करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार.”

या प्रकरणावरून शिवसेना (उबाठा) नेते वैभव नाईक यांनी भाजप व बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) दोघांवरही थेट हल्ला चढवला. “मताला दहा-दहा हजार वाटपाचे फोन येत आहेत. दोन्ही पक्षांकडून पैशांचा पाऊस पडतोय. मालवणातील प्रकार हा त्याचाच नमुना आहे. लोकसभा-विधानसभेलाही हेच लोक एकत्र पैसे वाटत होते,” अशी टीका त्यांनी केली.

एकूणच, तळकोकणातील निवडणूक तापमान दिवसेंदिवस वाढत असून शिवसेना-भाजपची जुनी दोस्ती आता स्पष्टपणे संघर्षात रूपांतरित होत आहे. पुढील काही दिवसांत हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now