
छत्रपती संभाजीनगर /
सध्या जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जायकवाडी धरणातून लवकरच गोदावरी नदीपात्रात पाणी विसर्ग सुरू केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आज दिनांक 26 जुलै 2025 रोजी जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 80.70% इतका भरलेला असून, धरणाच्या जलप्रचलन आराखड्यानुसार आता जलपातळीचे नियमन करणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे येत्या काही तासांमध्ये किंवा दिवसांत नदीपात्रात पाणी सोडण्यात येऊ शकते.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे नदीकाठच्या गावांना खालील सूचना देण्यात आल्या आहेत:
नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवरील गावांमध्ये तात्काळ सतर्कतेचे आदेश दिले जावेत.
नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये, यासाठी ग्रामपंचायती, पोलिस यंत्रणा आणि स्थानिक यंत्रणांनी संयुक्तरीत्या जनजागृती करावी.
पाळीव प्राणी, गुरेढोरे, विद्युत मोटारी, शेतीसामान आदी साहित्य सुरक्षित स्थळी हलवावे.
कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये, यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश.
स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथकांना अलर्ट ठेवण्यात यावे.