
माजलगाव /
जागतिक सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात उत्कृष्ट योगदानाबद्दल तेलगाव येथील लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्यास ग्रीन वर्ल्ड को प्राईड २०२५ चा प्रतिष्ठेचा व मानाचा पुरस्कार जाहीर झाला.याबद्दल कारखाना चेअरमन, व्हा.चेअरमन, कार्यकारी संचालकांसह कारखाना प्रशासनावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वर्ल्ड व कॉसमॉस को. ऑपरेटिव्ह बँक लि. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या संस्था,व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.त्याप्रमाणे या वर्षीचा जागतिक सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात उत्कृष्ठ योगदानाबद्यल दिला जाणारा “ग्रीन वर्ल्ड को. प्राईड-२०२५ ” हा पुरस्कार तेलगाव येथील लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना लि, सुंदरनगर कारखान्यास नुकताच घोषीत झाला.तसे पत्र ग्रीन वर्ल्ड पब्लीकेशनच्या वतीने सोळंके कारखान्यास कळविले असल्याची माहिती चेअरमन श्री. विरेंद्रदादा सोळंके यांनी दिली. ते म्हणाले की, लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक सभासदांच्या आर्थिक हिताचे रक्षण करताना ऊसाला दिलेला यथोचित व स्पर्धात्मक दर, साखर उत्पादनातील गुणवत्ता, उत्पादन खर्चातील सुव्यवस्था आणि कारखाना व्यवस्थापनातील पारदर्शकता यांचा उत्तम संगम साधला आहे. त्याचबरोबर कारखान्याच्या व्यापक विकासासाठी इथेनॉल उत्पादन, को. जनरेशन प्रकल्प (बिज उत्पादन), प्रेसमड व बायो फर्टीलायझर उत्पादन, डिस्टिलरी, कचरा व्यवस्थापन, बायोगॅस प्रकल्प यातील काही जोड व्यवसायांचे यशस्वीपणे संचालन करुन शाश्वत विकासाचे मॉडेल निर्माण केले आहे. या सर्व उपक्रमांव्दारे शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ, स्थानिक अर्थव्यवस्थेची मजबुती आणि ग्रामीण भागातील रोजगार निर्मातीस मोठा हातभार लागलेला आहे. सहकार मुल्यांवर आधारीत या प्रगत, पारदर्शक आणि समाजाभिमुख कारखाना व्यवस्थापनाच्या गुणांचा अभ्यास करुन वरील संस्थांनी कारखान्याची “ग्रीन वर्ल्ड को. प्राईड-२०२५ ” या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २१ डिसेंबर, २०२५ रोजी सहकार सभागृह कॉसमॉस को.ऑप. बँक लि, शिवाजीनगर पुणे येथे सन्माननीय केंद्रीय मंत्री व राज्यातील विविध खात्याचे मंत्री यांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
सदरचा प्रतिष्ठेचा पुरस्कार कारखान्यास मिळालेबद्यल सर्व सभासद, संचालक, अधिकारी, कर्मचारी, हितचिंतक यांचे वतीने कारखान्याचे जेष्ठ मार्गदर्शक मा.आ.श्री. प्रकाशदादा सोळंके, मा.श्री. धैर्यशीलकाका सोळंके, चेअरमन श्री. विरेंद्रदादा सोळंके, व्हा. चेअरमन श्री. जयसिंगभैय्या सोळंके, कार्यकारी संचालक श्री. आर. सी. बडगुजर यांचे अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.