महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर : विजांचा कडकडाट, वारे

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

मुंबई :
रविवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या पावसाने राज्यात पुन्हा एकदा हाहाकार माजवला आहे. मुंबई, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यांसह घाटमाथ्यावरील भागात रात्रभर विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि ५० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह मुसळधार पाऊस झाला. हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवस अति मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आहे.

Amazon

Amazon App Player

Download Now

मुंबईत सततचा पाऊस – नागरिकांना इशारा

मुंबई व उपनगर, ठाणे, नवी मुंबई, रायगड, लोणावळा, खंडाळा या भागांत रात्रभर पाऊस कोसळला. हवामान खात्याने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. मंत्रालयाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार पुढील तीन तासांत काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहतील.

चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण भागासह शहरांमध्येही सतर्कतेचं वातावरण आहे. मागच्या २४ तासांत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अति मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

कमी दाबाचा पट्टा – समुद्रकिनाऱ्यावर हाय अलर्ट

विदर्भापासून अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्याचा परिणाम महाराष्ट्रातील बहुतांश भागात जाणवत आहे. अरबी समुद्र किनाऱ्यावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या मते, हा परतीच्या मान्सूनचा पाऊस असून १५ ऑक्टोबरनंतर हळूहळू त्याचा जोर कमी होईल.

माजलगाव धरणाचे ११ दरवाजे उघडले

बीड जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे माजलगाव धरणक्षेत्रात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. यामुळे प्रशासनाने धरणाचे तब्बल ११ दरवाजे उघडले. त्यामुळे सिंदफणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठी कोणीही जाऊ नये, असं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

मनमाडच्या बाजाराला फटका – शेतकऱ्याला जीवदान

नाशिक जिल्ह्यातील मनमाड, नांदगाव परिसरात जोरदार पाऊस झाला. रविवारी झालेल्या आठवडी बाजारात मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालं. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यातील ईसापूर रमना गावात ओढ्याला आलेल्या पुरात एक शेतकरी वाहून गेला होता. यावेळी गावातील एका तरुणाने जीवाची बाजी लावून त्या शेतकऱ्याला वाचवलं. या धाडसी तरुणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

नागरिकांना प्रशासनाचे आवाहन

राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यानं प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. विशेषतः नद्या, नाले आणि धरणांच्या परिसरात जाणं टाळावं, घराबाहेर न पडणं योग्य ठरेल, असं सांगण्यात आलं आहे.

पावसाच्या या तडाख्यात निसर्गाच्या कोपापुढे माणूस हतबल ठरत असला, तरी रमना गावातील तरुणाने दाखवलेलं धाडस आणि जिद्द खऱ्या अर्थाने आशादायी ठरलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now