Beed News बीडमध्ये माजी पोलिस निरीक्षकाची आत्महत्या; जिल्ह्यात खळबळ

Spread the love

बीड :

अंबाजोगाई शहरात माजी पोलिस निरीक्षक सुनील रामराव नागरगोजे (वय 57) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी उशिरा रात्री ही घटना घडली असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागरगोजे हे मूळ परळी तालुक्यातील नागदरा गावचे रहिवासी होते. त्यांनी अनेक वर्ष पोलिस सेवेत काम केलं आणि काही महिन्यांपूर्वीच निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर अंबाजोगाई येथे स्वतःचं घर बांधायला घेतलं होतं. मात्र, बांधकाम सुरू असल्यामुळे ते प्रशांत नगर भागात भाड्याने राहत होते. गुरुवारी रात्री घरात कोणी नसताना त्यांनी सिलिंग फॅनला गळफास घेऊन जीवन संपवलं.

घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्वाराती रुग्णालयात पाठवण्यात आला. आत्महत्येचं नेमकं कारण मात्र समोर आलं नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

काही दिवसांपूर्वी सरकारी वकिलानेही जीवन संपवलं

ही घटना ताजी असतानाच काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यात अजून एक धक्कादायक प्रकार घडला होता. वडवणी न्यायालयात कार्यरत असलेले सहायक सरकारी अभियोक्ता ॲड. व्ही. एल. चंदेल (वय 48, रा. इंदेवाडी, जि. परभणी) यांनी आत्महत्या केली होती. जानेवारी 2025 मध्येच ते वडवणी न्यायालयात रुजू झाले होते. न्यायालयातीलच खिडकीला गळफास घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं.

सलग घटनांनी निर्माण केलेले प्रश्न

माजी पोलिस निरीक्षक आणि सरकारी वकिलासारख्या जबाबदार पदांवर काम केलेल्या व्यक्तींनी आत्महत्या केल्यानं जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली आहे. अशा पदावर राहून, समाजात जबाबदारी सांभाळूनही व्यक्तींना इतकं एकटं आणि असहाय्य का वाटतं, हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असला तरी या सलग घटनांनी सर्वसामान्यांना विचार करायला भाग पाडलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *