बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस ; प्रशासनाने नागरिकांना दिल्या दक्षतेच्या सूचना

Spread the love

बीड /
सद्यस्थितीत मान्सून सक्रिय झाला असून बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. नद्या, नाले व ओढे तुडुंब भरले असून पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू आहे. परिणामी अनेक ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असून अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे.


अनावश्यक प्रवास टाळा

प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांनुसार, मुसळधार पाऊस सुरू असताना नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा. पुलावरून पाणी वाहत असल्यास तो पूल ओलांडू नये. अनेक जण पुराच्या पाण्यात पोहण्याचा प्रयत्न करतात किंवा पाण्याची खोली न समजता पाण्यात उतरतात. असे प्रकार घातक ठरू शकतात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.


नदीकाठी गर्दी व सेल्फीचा मोह टाळा

पूर पाहण्यासाठी अनेकदा लोक नदीकाठ, नाल्यांवर किंवा धरण परिसरात गर्दी करतात. काहीजण सेल्फी काढण्याचा मोहही आवरू शकत नाहीत. प्रशासनाने नागरिकांना यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. नदीकाठच्या गावातील नागरिकांनी पाणीपातळी वाढल्यास त्वरित सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असेही सांगण्यात आले आहे.


मुलांवर लक्ष, पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठेवा

पावसाच्या दिवसांत मुलांना नदीकाठी, नाल्याजवळ किंवा धरण परिसरात जाण्यास परवानगी देऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्याचबरोबर वीज कडाडत असताना झाडाखाली उभे राहणे टाळावे आणि पाळीव प्राण्यांना देखील बांधून न ठेवता सुरक्षित स्थळी ठेवावे.


वीजपुरवठा बंद करून सुरक्षित स्थळी स्थलांतर

पूरामुळे घरात पाणी शिरण्याची शक्यता असल्यास तात्काळ वीजपुरवठा बंद करून सुरक्षित स्थळी जावे, अशी सूचना देण्यात आली आहे. जमिनीखालून जाणाऱ्या विद्युत तारांपासून सावध राहण्याचेही प्रशासनाने नागरिकांना बजावले आहे.


उकळून पाणी प्या, स्वच्छतेची काळजी घ्या

पुरामुळे दुषित पाणी पिण्याचा धोका वाढतो. त्यामुळे पिण्याचे पाणी नेहमी उकळून प्यावे. जेवणाआधी हात स्वच्छ धुवून घ्यावेत, अशी दक्षता बाळगावी. पूर ओसरल्यानंतर परिसर स्वच्छ करण्यासाठी प्रशासनाला मदत करावी आणि रोगराई टाळण्यासाठी आरोग्यविषयक खबरदारी घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.


आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी त्वरित संपर्क साधा

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी (1077) संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे – आवाहन

जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, नागरिकांनी निष्काळजीपणा टाळून सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे. प्रशासन सर्वतोपरी दक्ष असून आपत्ती टाळण्यासाठी नागरिकांचा सतर्कपणा आणि सहकार्य अत्यावश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *