सध्या देशात ऑनलाइन ऑर्डर करण्याची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. जेवण असो वा इतर कोणतीही वस्तू, आजकाल बहुतेक लोक मोबाईलवरूनच ऑर्डर देणे पसंत करतात. Blinkit, Zepto, Swiggy, Zomato यांसारख्या कंपन्या ग्राहकांना घरपोच सेवा देत आहेत. या कंपन्यांचे डिलिव्हरी बॉय अवघ्या काही मिनिटांत ग्राहकांच्या दारात ऑर्डर घेऊन पोहोचतात.

असाच एक अहवाल ‘मनी कंट्रोल’ने प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये असे नमूद केले आहे की, या कंपन्यांमधील काही डिलिव्हरी एजंट्स वर्षाकाठी आयटी कंपन्यांतील फ्रेशर्सपेक्षाही अधिक कमाई करत आहेत.

TCS, Infosys यांसारख्या नामांकित आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे फ्रेशर्स सरासरी वार्षिक ₹2 ते ₹2.5 लाख रुपये कमावतात. परंतु Blinkit, Zepto, Swiggy आणि Zomato या कंपन्यांमधील काही डिलिव्हरी एजंट्सची वार्षिक कमाई ₹3 ते ₹5 लाखांपर्यंत पोहोचते. मात्र, डिलिव्हरी बॉयचे उत्पन्न हे त्यांच्या मेहनतीवर आणि ऑर्डर्सच्या संख्येवर अवलंबून असते.
“जितकी मेहनत, तितकी कमाई” — हे सूत्र या क्षेत्रात अगदी लागू पडते.
डिलिव्हरी एजंटचे उत्पन्न विविध घटकांवर अवलंबून असते:
त्यांनी पूर्ण केलेल्या डिलिव्हरीची संख्या
कामाचे तास
शहरातील मागणी आणि ऑर्डर्सची संख्या
विशेषतः मुंबई, दिल्ली, पुणे, बंगळुरू यांसारख्या मेट्रो शहरांमध्ये ऑनलाइन फूड डिलिव्हरीचा मोठा ट्रेंड आहे, त्यामुळे तिथे डिलिव्हरी बॉयजचे उत्पन्नही तुलनेने अधिक असते.
डिलिव्हरी एजंट्सना काही मर्यादा देखील
या एजंट्सना आरोग्य विमा, सवलती, रजा किंवा निश्चित पगार अशा सुविधा मिळत नाहीत. ते पूर्णपणे ‘पे-पर-डिलिव्हरी’ वर काम करतात. त्यामुळे काम जास्त, तरच उत्पन्न जास्त.
आयटी क्षेत्रातील फायदे
दुसऱ्या बाजूला, आयटी कंपन्यांमध्ये फ्रेशर्सना सुरुवातीला कमी पगार मिळतो, परंतु त्यांना आरोग्य विमा, भविष्य निर्वाह निधी (PF), पगारी रजा, पदोन्नती आणि अनेक स्थिर सुविधा दिल्या जातात. त्यामुळे दीर्घकालीन दृष्टीकोनातून पाहता आयटी क्षेत्रात करिअरचा विकास अधिक स्थिर आणि सुरक्षित असतो.