Beed Crime:संस्थाचालकाच्या छळाला कंटाळून २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या; परळी तालुक्यातील घटना

Spread the love

आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी संस्थाचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला

कुटुंबियांचा आरोप – “अनुकंपा नोकरीसाठी संस्थाचालकांनी केला मानसिक छळ”

परळी :
परळी – येथील नंदागौळ गावात एका २५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षण संस्थेच्या मालकांनी केलेल्या मानसिक आणि आर्थिक छळाला कंटाळून या तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला आहे. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात संस्थाचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?


नंदागौळ येथील रहिवासी श्रीनाथ गोविंद गिते (वय २५) या तरुणाने शुक्रवारी (२२ऑगस्ट २०२५) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तो नुकताच वसंतनगर येथील आश्रमशाळेत अनुकंपा तत्त्वावर ‘सेवक’ म्हणून रुजू झाला होता. यापूर्वी तो केज येथील एका निवासी शाळेत बारा वर्षांपासून चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून काम करत होता, मात्र त्याला कायम करण्यात आले नव्हते.
मयत श्रीनाथच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीनुसार, केज येथील सानेगुरुजी निवासी विद्यालयाचे संस्थाचालक उद्धव माणिक कराड आणि परळी तालुक्यातील प्राथमिक आश्रमशाळा वसंतनगर तांडाचे संस्थाचालक संजय परशुराम राठोड यांनी श्रीनाथला नोकरी कायम करण्यासाठी किंवा अनुकंपा तत्त्वावर नोकरी न देण्यासाठी मानसिक त्रास आणि आर्थिक मागणी केली होती. या सततच्या मानसिक छळामुळे आणि आर्थिक अडचणींमुळे श्रीनाथने हे टोकाचे पाऊल उचलले, असे त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले.
श्रीनाथची आई गंभीर आजाराने त्रस्त असून त्याचे वडीलही शैक्षणिक संस्थेत नोकरी करत असतानाच मृत पावले होते. त्यामुळे कुटुंबाचा संपूर्ण भार त्याच्यावरच होता.
संस्थाचालकांविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी, मयत तरुणाची आई सुनीता गोविंद गिते यांनी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे उध्दव माणिक कराड आणि संजय परशुराम राठोड या दोन्ही संस्थाचालकांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 108, 351(2), 352, 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक निमोणे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *