Jayakvadi Dam Update जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याचा इशारा; गोदावरी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Spread the love

छत्रपती संभाजीनगर :
२० ऑगस्ट :
मराठवाड्यातील सर्वात मोठे जलस्रोत असलेल्या जायकवाडी धरणात सध्या मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे. पावसाळी कालावधीत पाणलोट क्षेत्रात सतत होत असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे गोदावरी व उपनद्यांमधून धरणात पाणी येत आहे. त्यामुळे धरणाचा जलसाठा तब्बल ९५.०५ टक्क्यांवर पोहोचला असून पाणी विसर्गाची शक्यता निर्माण झाली आहे.

धरण प्रशासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालयांना पाठवलेल्या पत्रानुसार, धरणाच्या जलप्रचलन आराखड्यानुसार (Reservoir Operation Schedule) पातळीचे नियमन करणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे येत्या ४८ तासांत कोणत्याही क्षणी धरणातून पाणी सोडण्यात येऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे.

यामुळे गोदावरी नदीपात्र व नदीकाठच्या गावांना पूरस्थितीची शक्यता लक्षात घेऊन सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. संबंधित जिल्ह्यांमध्ये — छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी व नांदेड — प्रशासनाला आधीच पत्राद्वारे सूचित करण्यात आले आहे.

जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग झाल्यास नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सावध राहावे, नदीपात्रात न उतरता सुरक्षित स्थळी राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच स्थानिक प्रशासनाने बचाव आणि आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

जायकवाडी धरण हे मराठवाड्यातील महत्त्वाचे जीवनवाहिनी मानले जाते. सध्या मोठ्या प्रमाणावर आवक सुरू असल्याने पुढील काही दिवसांत धरणाचे दरवाजे उघडले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *