प्रेमपत्र’ म्हणत पोलिसांच्या नोटीसीवर भाई गुंडांचा पलटवार; सत्ताधाऱ्यांवर सोशल मीडियावर सडकून टीका

Spread the love

अनाधिकृत बॅनर वरून अजित दादाची गाडी अडवण्याचा दिला होता इशारा दिवसभर भाई गुंड पोलिसांच्या नजर कैदेत

केज/

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बीड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य भाई मोहन गुंड यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर केज पोलिसांनी त्यांना भारतीय नागरीक न्याय संहिता (बी. एन. एस) कलम १६८ नुसार नोटीस बजावली. विशेष म्हणजे, ही नोटीस मिळाल्यानंतर गुंड यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी तिला ‘प्रेमपत्र’ असे संबोधून सत्ताधारी आणि प्रशासनावर जोरदार टीका केली आहे

भाई गुंड यांनी ५ ऑगस्ट रोजी माध्यमांशी बोलताना बीड शहरातील अनधिकृत राजकीय बॅनर न हटविल्यास “अजित पवार यांच्या गाडीसमोर काळे झेंडे दाखवले जातील,” असा इशारा दिला होता. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे कारण देत पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवली. नोटीसमध्ये वक्तव्य खंडन करण्याचा सल्ला देत, शांतता भंग करणारी कोणतीही कृती टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

गुंड यांना मिळालेली नोटीस ही “राजकीय दबावाची प्रतिक्रिया” असल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. दिवसभर सोशल मीडियावर याविषयी टीकेची लाट उसळली होती. भाई गुंड यांनी एका पोस्टमध्ये म्हटले, “प्रेमपत्र प्राप्त… सत्ताधाऱ्यांनी माज करू नये आणि प्रशासनाने त्यांचे बटिक होऊ नये, यासाठी आम्ही लढत राहू.”

ते पुढे म्हणाले, “जर क्रांतिसिंह नाना पाटील, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांच्या शेतकरी कामगार पक्षाच्या मोजक्या बॅनरला बीड नगरपरिषदेला वावडे वाटत असेल, तर सत्ताधाऱ्यांचे शेकडो बॅनर का सहन केले जात आहेत?”

दरम्यान, ३ ऑगस्ट रोजी झालेल्या एका कार्यक्रमाच्या बॅनरवरून हे वादळ निर्माण झाले होते. गुंड यांच्या भूमिकेमुळे या मुद्द्याला राजकीय वळण लागले आणि अखेर शहरातील काही बॅनर बीड नगरपरिषदेला हटवावे लागले. सोशल मीडियावर जिल्हाभरातून कार्यकर्त्यांनी गुंड यांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया नोंदवल्या.लाल बावट्याचे कार्यकर्ते चांगलेच संतापलेले दिसून आले आणि अनेकांनी पोलिस प्रशासनाचा निषेध व्यक्त केले.

शेवटी, भाई गुंड यांनी पोलिसांना लेखी खुलासा दिल्यानंतर रात्री ८ वा त्यांची सुटका करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *