कोल्हापूर : येथील दीपक आप्पासाहेब धर्माधिकारी (वय ६९) यांच्या अवयवदानामुळे दोन रुग्णांना नवजीवन मिळाले. प्रशासनाच्या काटेकोर नियोजनामुळे आणि विविध यंत्रणांच्या समन्वयातून शुक्रवारी सांगली–कोल्हापूर व सांगली–नाशिक असे दोन स्वतंत्र ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आले.

ब्रेन डेड झालेल्या धर्माधिकारी यांचे यकृत सांगलीहून अवघ्या २५ मिनिटांत कोल्हापूर विमानतळावर पोहोचले. तेथून विशेष विमानाद्वारे दीड तासांच्या आत नाशिकला नेण्यात आले. त्याच वेळी धर्माधिकारी यांची किडनी सांगलीहून ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून रस्ते मार्गे थेट नाशिकला पोहोचवण्यात आली. वेळेच्या शर्यतीत ही संपूर्ण प्रक्रिया यशस्वी ठरली.
मृत्यू हे अंतिम सत्य मानले जाते; मात्र विज्ञानाच्या प्रगतीमुळे ‘मरावे परी अवयवरूपी उरावे’ या म्हणीचा हृदयस्पर्शी अनुभव आज सांगली व कोल्हापूरकरांनी घेतला. धर्माधिकारी यांचे यकृत व मूत्रपिंड नाशिकमधील दोन गंभीर रुग्णांसाठी जीवनरक्षक ठरले.
या मोहिमेसाठी कोल्हापूर विमानतळावर विशेष तयारी करण्यात आली होती. अवयव घेऊन जाण्यासाठी बंगळूरहून कोल्हापुरात आलेल्या विमानाला अतिरिक्त विमान वाहतूक नियंत्रण सेवा देण्यात आली. सुरक्षा परवाने, तपासणी प्रक्रिया, ग्राऊंड हँडलिंगसाठी आवश्यक कागदपत्रे आणि सर्व यंत्रणांमधील समन्वय अतिशय तत्परतेने पूर्ण करण्यात आला.
ग्रीन कॉरिडॉरची अखेरची मोहीम विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. अॅम्ब्युलन्सची वेळ, वैमानिक दलाची तयारी आणि तांत्रिक समन्वय यामध्ये संदीप सूर्यवंशी, प्रवीण आढाव व विकास पुजारी यांनी मोलाचे योगदान दिले.
मानवी संवेदना, प्रशासनाची तत्परता आणि विज्ञानाची ताकद यांचा संगम साधणारी ही घटना समाजात अवयवदानाबाबत सकारात्मक संदेश देणारी ठरली आहे.