बर्दापूर : येथील सरस्वती न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल, बर्दापूर मध्ये दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी नर्सरी, एल.के.जी. व यू.के.जी.च्या चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी ‘लाल रंगाची ओळख’ हा उपक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात पार पडला. लहान वयातच रंगांची ओळख, निरीक्षणशक्ती तसेच सर्जनशीलता विकसित व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

शाळेचे मुख्याध्यापक श्री. मधुकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संपूर्ण शाळा लाल रंगात न्हाऊन निघाल्याचे चित्र पाहायला मिळाले. विद्यार्थी लाल रंगाची वस्त्रे परिधान करून शाळेत आले होते. तसेच लाल सफरचंद, डाळिंब, टोमॅटो, लाल फुगे, खेळणी व इतर साहित्य घेऊन त्यांनी उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व मनोरंजक कृती राबविण्यात आल्या. रंगांची ओळख, वस्तूंची नावे, गाणी, गोष्टी, कृतीआधारित शिक्षण व खेळ यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आनंददायी पद्धतीने ज्ञान देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास तसेच शिकण्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत झाली.

या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अर्पिता कुलकर्णी मॅडम, जना माने मॅडम, सुनिता सोनवणे मॅडम व सीमा कोरडे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याशी संवाद साधत उपक्रम अधिक आकर्षक व परिणामकारक केला.
या प्रसंगी पालकांनीही उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. लहान वयातच अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ‘लाल रंगाची ओळख’ उपक्रमामुळे शाळेतील वातावरण आनंद, उत्साह व रंगीबेरंगी अनुभवांनी भरून गेले.