बीड: राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार बीड जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांमध्ये मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली असून आज, २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. बीड, गेवराई, माजलगाव, परळी वैजनाथ, अंबाजोगाई आणि किल्ले-धारुर या नगरपरिषदांसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत थेट अध्यक्ष व सदस्य पदासाठी मतदान घेण्यात आले होते.

दरम्यान, काही प्रभागांमध्ये दाखल झालेल्या अपिलांमुळे बीड, परळी वैजनाथ, अंबाजोगाई व किल्ले-धारुर या नगरपरिषदांमध्ये २० डिसेंबर २०२५ रोजी पुन्हा मतदान घेण्यात आले. या सर्व निवडणुकांची मतमोजणी आज सकाळी १० वाजल्यापासून संबंधित मतमोजणी केंद्रांवर पार पडणार आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी बीड मा. विवेक जॉन्सन यांनी निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच पोलीस अधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली. मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक, शांततामय व कायदेशीर वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासनाची संपूर्ण तयारी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मतमोजणी केंद्रावर अधिस्वीकृत पत्रकार व प्रसार माध्यम प्रतिनिधींसाठी स्वतंत्र मीडिया सेल स्थापन करण्यात आला असून फेरीनिहाय मतमोजणीची अधिकृत आकडेवारी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्फत उपलब्ध करून दिली जाणार आहे. मात्र मतमोजणी कक्षात केवळ उमेदवार व त्यांचे अधिकृत मतमोजणी प्रतिनिधी यांनाच प्रवेश दिला जाणार असून मोबाईल फोन किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक उपकरणे बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
मतमोजणीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी मतमोजणी केंद्र परिसरात गर्दी, घोषणाबाजी, मिरवणूक किंवा शक्तीप्रदर्शन टाळावे. तसेच अफवा, भडक वक्तव्ये किंवा सोशल मीडियावर चुकीची माहिती प्रसारित करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, उमेदवार किंवा राजकीय पक्षाविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देत संयम, शिस्त आणि लोकशाही मूल्यांचा सन्मान राखून मतमोजणी प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मा. विवेक जॉन्सन यांनी केले आहे.