Latur Crime News : लातूर जिल्ह्यातील कार जळीत कांडाने अवघा महाराष्ट्र हादरून गेला असतानाच, या घटनेमागची धक्कादायक पार्श्वभूमी आता समोर आली आहे. एका निष्पाप व्यक्तीला जिवंत जाळून स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचण्यामागे कर्जाचा डोंगर आणि एक कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स लाटण्याचा अमानवी कट असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.

औसा तालुक्यातील वानवडा परिसरात घडलेल्या या घटनेतील आरोपी गणेश गोपीनाथ चव्हाण (रा. विठ्ठल नगर, औसा) हा फायनान्स कंपनीत कार्यरत होता. मागील काही काळापासून तो तीव्र आर्थिक विवंचनेत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर विविध कर्जांचे ओझे होते. सुमारे ४७ लाख रुपयांचे कर्ज, त्यात घेतलेला फ्लॅट आणि इतर आर्थिक जबाबदाऱ्या यामुळे दरमहा सुमारे ७५ हजार रुपयांचा हप्ता भरण्याची वेळ त्याच्यावर आली होती. या ताणातून तो आत्महत्येचा विचार करत असल्याचेही तपासात उघड झाले आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
टर्म इन्शुरन्ससाठी अमानवी योजना
गणेश चव्हाणला सहा वर्षांची मुलगी आणि तीन वर्षांचा मुलगा असून कुटुंबाच्या भवितव्याची चिंता त्याच्या मनात होती. त्याने एक कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स काढला होता. फायनान्स क्षेत्रातील अनुभवामुळे इन्शुरन्सची रक्कम मिळवण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव करण्याची क्रूर कल्पना त्याच्या डोक्यात आली. या पैशातून कर्ज फिटेल, असा त्याचा गैरसमज होता. त्यातूनच त्याने हा अमानवी कट रचल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्या रात्री नेमकं काय घडलं?
१३ डिसेंबरच्या रात्री औसा येथील याकतपूर मोड परिसरात आरोपी स्कोडा कारमधून जात असताना गोविंद किसन यादव (वय ५०, रा. पाटील गल्ली, औसा; मूळ रा. बोरफळ) यांनी लिफ्ट मागितली. दोन ते अडीच एकर शेतीवर आणि मजुरीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे गोविंद यादव साधे, कष्टकरी व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या पश्चात दोन मुलं, शेती आणि कुटुंब आहे.
पोलीस तपासानुसार, आरोपीने यादव यांना गाडीत बसवून औसा टी-पॉईंट मार्गे पुढे नेले. एका धाब्यावर दारू पाजली, चिकन खाऊ घातले. नंतर दारूच्या नशेत असताना वानवडा पाटी–वानवडा रस्त्यावर नेले. यादव झोपेत गेल्यानंतर आरोपीने त्यांना ड्रायव्हर सीटवर बसवून सीट बेल्ट लावला, बांधून ठेवले आणि वाहनात ज्वलनशील साहित्य ठेवून कारला आग लावली. कारच्या पेट्रोल टाकीचे झाकणही उघडे ठेवण्यात आले होते, जेणेकरून आग अधिक भडकेल.
तपासाला कलाटणी
१४ डिसेंबरच्या मध्यरात्री डायल ११२ वरून वाहन जळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर औसा पोलीस घटनास्थळी पोहोचले. कारमध्ये अर्धवट जळालेला मानवी सांगाडा आढळून आला. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद झाली. मात्र तपासात जळालेली कार आरोपीच वापरत असल्याचे स्पष्ट झाले.
स्थानिक गुन्हे शाखा आणि औसा पोलिसांच्या संयुक्त तपासात आरोपी जिवंत असल्याचा संशय बळावला. आरोपी एका विवाहित मैत्रिणीशी नव्या मोबाईल नंबरवरून चॅटिंग करत असल्याचा धागा पोलिसांच्या हाती लागला. मोबाईल टॉवर लोकेशनच्या आधारे आधी कोल्हापूर, नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शोध घेत आरोपीला विजयदुर्ग येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिली.
पाच दिवसांची पोलीस कोठडी
या प्रकरणी खून आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सुरू आहे. कर्जाच्या ओझ्याखाली आणि एक कोटी रुपयांच्या विम्यासाठी एका निष्पाप माणसाचा बळी घेणाऱ्या या अमानवी कृत्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, लातूर पोलिसांच्या जलद व अचूक तपासाचे सर्वत्र कौतुक होत आहे.