Nitish Kumar News : भर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वर्तन; महिला डॉक्टरचा हिजाब ओढल्याचा व्हिडिओ व्हायरल

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावरून राज्याच्या राजकारणात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या व्हिडिओमध्ये नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रमादरम्यान एका मुस्लिम महिला डॉक्टरसोबत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलेल्या कृत्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

Amazon

Amazon App Player

Download Now

ही घटना पाटणा येथील मुख्यमंत्री सचिवालयातील ‘संवाद’ इमारतीत पार पडलेल्या आयुष डॉक्टरांच्या नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रमातील आहे. या कार्यक्रमात काही निवडक उमेदवारांना मुख्यमंत्री स्वतः नियुक्तीपत्र देत होते. यावेळी महिला डॉक्टर नुसरत परवीन नियुक्तीपत्र घेण्यासाठी मंचावर आल्या होत्या. त्या हिजाब परिधान करून होत्या.

व्हिडिओमध्ये दिसतं की, नियुक्तीपत्र दिल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी “हे काय लावलंय?” असा प्रश्न विचारत, उत्तराची वाट न पाहता स्वतःच त्यांच्या चेहऱ्यावरील हिजाब खाली ओढला. या क्षणी महिला डॉक्टर काही काळ अस्वस्थ आणि गोंधळलेल्या दिसतात. मंचावर उपस्थित काही अधिकारी हसताना दिसत असून, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांना थांबवण्याचा प्रयत्न केल्याचंही व्हिडिओत स्पष्ट होतं.

या घटनेनंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रीय जनता दल (RJD) ने हा व्हिडिओ अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून शेअर करत मुख्यमंत्र्यांच्या मानसिक स्थितीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पक्षाचे प्रवक्ते एजाज अहमद यांनी हे कृत्य महिलांच्या सन्मानाविरोधात असून, अल्पसंख्याक समुदायाबाबत सत्ताधारी एनडीए सरकारची भूमिका स्पष्ट करत असल्याचा आरोप केला. आरजेडीचे नेते मृत्यूंजय तिवारी यांनी तर, “मुख्यमंत्री आता बिहार चालवण्याच्या स्थितीत नाहीत,” अशी तीव्र टीका केली आहे.

काँग्रेसनेही या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसने व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्र्यांच्या वर्तनाला “बेशरम” ठरवत, सार्वजनिक व्यासपीठावर एका महिला डॉक्टरचा हिजाब खेचणं अत्यंत गंभीर आणि लज्जास्पद असल्याचं म्हटलं आहे. यावरून राज्यातील महिलांची सुरक्षा आणि सत्ताधाऱ्यांची मानसिकता स्पष्ट होते, असा आरोप करत काँग्रेसने नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणावर नितीश कुमार किंवा त्यांच्या पक्षाकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र जद(यू)च्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या कार्यकाळात महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि अल्पसंख्याक कल्याणासाठी मोठ्या प्रमाणात काम केलं असून, या घटनेचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे बिहारच्या राजकारणात नवा वाद पेटला असून, महिलांचा सन्मान, अल्पसंख्याकांचे अधिकार आणि मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीच्या सार्वजनिक वर्तनावर पुन्हा एकदा तीव्र चर्चा सुरू झाली आहे. विरोधी पक्ष या मुद्द्यावरून सत्ताधारी एनडीए सरकारवर दबाव वाढवण्याच्या तयारीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now