
वडवणी / बीड
राजस्थानमधील काही महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती वडवणी तालुक्यातील चिंचवन गावात झाल्याची घटना आज समोर आली आहे. गावातील शेतकरी श्री. किसन दोडताले यांच्या शेतातील २०१९ मध्ये बंद पडलेला बोअरवेल अचानकच पाण्याने वाहू लागला आहे.
आज सकाळपासून या बोअरवेलमधून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत असून गेले ३ ते ४ तास हे पाणी अविरत वाहत आहे. यामुळे संपूर्ण शेतात पाणीच पाणी झाले असून कापसाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी दोडताले यांनी याबाबत स्थानिक प्रशासनाला माहिती दिली असली तरी अद्याप प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही, ही बाब चिंता वाढवणारी आहे.
पाण्याचा वेग व प्रमाण पाहता ही बाब केवळ नैसर्गिक नाही, असा संशय व्यक्त करत आहेत. बोअरवेलमधून अशा प्रकारे अचानक पाणी बाहेर पडण्यामागे जमिनीतील दबाव, जलस्तरात झालेला बदल, किंवा इतर काही भौगोलिक कारणं असू शकतात.
गावकरी आणि शेजारील शेतकरीसुद्धा या घटनेमुळे धास्तावले आहेत. शेतीचे नुकसान भरून देणे आणि या घटनेचा तात्काळ तपास करून आवश्यक ती उपाययोजना करणे, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.