सुरक्षेचा संदेश देत जागतिक बालसुरक्षा दिन साजरा – सरस्वती न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल, बर्दापूर

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

बर्दापूर : सरस्वती न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल, बर्दापूर येथे जागतिक बालसुरक्षा दिन मुख्याध्यापक श्री. मधुकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात व उपक्रमशील वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेविषयी जाणीव निर्माण करणे, त्यांना स्वयंरक्षणाचे महत्त्व पटवून देणे तसेच मानसिक, शारीरिक व सामाजिक सुरक्षिततेबाबत जागरूक बनविणे, हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

Amazon

Amazon App Player

Download Now

या निमित्ताने शाळेत बालसभा आयोजित करण्यात आली. या बालसभेत विद्यार्थ्यांनी त्यांच्या दैनंदिन जीवनातील अनुभव, अडचणी व सुरक्षिततेबाबतचे विचार मुक्तपणे मांडले. विद्यार्थ्यांना स्वतःच्या भावना व्यक्त करता याव्यात व समस्या लपवून न ठेवता बोलता याव्यात, या उद्देशाने शाळेत तक्रार पेटी सुरू करण्यात आली. सकाळच्या परिपाठावेळी प्राप्त तक्रारींचे वाचन करून त्यावर शिक्षकांकडून समुपदेशन व योग्य मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच विद्यार्थ्यांना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श (Good Touch – Bad Touch) याबाबत माहिती देण्यासाठी प्रोजेक्टरद्वारे माहितीपूर्ण लघुपट दाखविण्यात आला. या दृश्य माध्यमातून विद्यार्थ्यांना अनोळखी व्यक्तींपासून सावध राहणे, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी संपर्क साधणे तसेच कोणत्याही संशयास्पद घटनेची त्वरित माहिती देण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यार्थी अमृता चव्हाण, प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थी स्नेहल सोमवंशी, तसेच संस्थापक ताराचंद शिंदे व मुख्याध्यापक मधुकर जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रेया गायकवाड यांनी प्रभावीपणे केले तर आभारप्रदर्शन आविष्कार शिंदे यांनी केले.

समारोपप्रसंगी मुख्याध्यापक श्री. मधुकर जाधव म्हणाले की, “आजची मुले उद्याच्या देशाचे भविष्य आहेत. त्यांच्या सुरक्षिततेकडे गांभीर्याने पाहणे ही केवळ पालकांचीच नव्हे, तर शिक्षक व समाजाचीही सामूहिक जबाबदारी आहे.” त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने वागण्याचा, चुकीच्या गोष्टींना ‘नकार’ देण्याचा आणि अडचणीच्या प्रसंगी योग्य व्यक्तींशी संवाद साधण्याचा सल्ला दिला.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी “माझी सुरक्षा – माझी जबाबदारी” या घोषवाक्याने परिसर दणाणून सोडला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला असून, पालक व शिक्षक यांच्यातही जागरूकतेची भावना वाढीस लागल्याचे चित्र दिसून आले.

या उपक्रमास शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. बालसुरक्षा संदर्भातील असा उपक्रम शैक्षणिक संस्थांमध्ये सातत्याने राबविला जावा, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now