
कर्नाटकातील गदग येथील शांतिदुर्ग ज्वेलर्स दुकान फोडून तब्बल १९ किलो चांदी आणि ७०० ग्रॅम सोन्याचा माल घेऊन फरार झालेल्या चोरट्याला अखेर पोलिसांनी थरारक सापळा रचत किणी (ता. हातकणंगले) टोल नाक्यावर पकडले. गदगपासून पुण्यापर्यंत पळ काढण्याचा त्याचा डाव पाठीमागील प्रहरी उधळला.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
अहमदाबाद येथील नागपूरवाला चाळ येथे राहणारा महमद हुसेन असे या संशयिताचे नाव आहे. चोरीनंतर काही तासांतच त्याला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले. चोरी केलेला माल त्याने दोन मोठ्या बॅगांमध्ये भरून हुबळी-मुंबई आराम बसने प्रवास सुरू केला होता.
पहाटे दुकान फोडलं, सकाळी धक्का
बुधवारी पहाटे गदगमधील शांतिदुर्ग ज्वेलर्स दुकान फोडण्यात आले. दुकानाच्या मालकाला सकाळी हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. सोन्या-चांदीचे दागिने, बेंटेक्स, चांदीमुलामा दागिने आणि मौल्यवान खडे असा ८० लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल चोरट्याने पळवला होता.
सीसीटीव्हीतून माग काढला; खबऱ्याने दिली ‘इनपुट’
कर्नाटक पोलिसांनी महामार्गावरील सीसीटीव्हीतून त्या चोरट्याच्या हालचाली शोधण्यास सुरुवात केली. खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार चोरटा बेळगावमार्गे कोल्हापूरमार्गे पुण्याकडे निघाला असल्याची खात्री पटली. हुबळीतील तपासात कळाले की संबंधित बस कोल्हापूरच्या पुढे गेली आहे.
त्यानंतर पोलिसांनी तातडीने कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधत संपूर्ण माहिती पुरवली.
किणी टोल नाक्यावर ‘ऑपरेशन सापळा’
जिल्हा पोलिसप्रमुखांच्या आदेशानुसार पेठवडगाव पोलिसांनी किणी पथकर नाक्यावर सापळा रचला.
पोलिस निरीक्षक प्रमोद शिंदे, उपनिरीक्षक माधव डिगोळे, फौजदार आबा गुंडणके, महेश गायकवाड, अनिल आष्टेकर, राजू साळुंखे यांच्या पथकाने बस येताच तिला थांबवले.
संशयित हुसेनला बसमधून खाली उतरवून झडती घेतली असता दोन बॅगांमध्ये भरलेले १९ किलो चांदी, ७०० ग्रॅम सोने आणि रोकड असे एकूण ८० लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
गदग पोलिसांकडे सुपूर्दगी
सायंकाळी गदग येथील उपविभागीय पोलिस अधिकारी मुरतजा काद्री आणि पोलिस निरीक्षक धीरज शिंदे किणी येथे पोहोचले. त्यांनी संशयितास आणि जप्त मुद्देमाल ताब्यात घेतला आणि पुढील तपासासाठी गदगकडे रवाना झाले.
किणी टोल नाक्यावरच्या या जलद कारवाईमुळे मोठी चोरी उघडकीस येऊन एक मोठा गुन्हा थंडावला आहे.