जुन्नर : बिबट्याच्या दहशतीत गाव, खेळायला गेलेली दोन भावंडं बेपत्ता; शेततळ्यात आढळले मृतदेह

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

जुन्नर (पुणे) : इदगाह मैदानाजवळील शेततळ्यात शनिवारी सायंकाळी दोन सख्या भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली. आफान अफसर इनामदार (वय 10) आणि रिफत अफसर इनामदार (वय 7, रा. इस्लामपुरा, खडकवस्ती, जुन्नर) अशी या मुलांची नावे आहेत. अचानक बेपत्ता झालेल्या मुलांचे मृतदेह तळ्यात सापडल्यानंतर संपूर्ण जुन्नर परिसरात शोककळा पसरली आहे.

Amazon

Amazon App Player

Download Now

खेळायला गेलेली मुलं परतलीच नाहीत

शनिवारी दुपारी चारच्या सुमारास मुलं घराबाहेर खेळण्यासाठी गेली. बराच वेळ उलटूनही मुलं परतली नाहीत, तेव्हा त्यांच्या आईला शंका आली. तिने तातडीने जुन्नर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.

पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली. मुलं नेहमी खेळायला जाणाऱ्या भागात शोध घेत असताना, परिसरात बिबट्याच्या वावराची माहिती मिळाल्याने वनविभागालाही बोलावण्यात आले. पोलिस, वनविभाग आणि स्थानिक नागरिकांनी मिळून ड्रोनच्या सहाय्याने शोधमोहीम वेगाने राबवली.

शेततळ्याकाठी आढळले संशयास्पद बूट आणि चप्पल

शोधादरम्यान शेततळ्याच्या काठावर मुलांचे बूट आणि चप्पल पडलेली दिसली. त्यानंतर तपासाची दिशा शेततळ्याकडे वळली. रात्री साडेनऊच्या सुमारास मुलांचे दोन्ही मृतदेह तळ्यात आढळले.

तत्काळ मृतदेह बाहेर काढून जुन्नर रेस्क्यू टीमच्या ॲम्ब्युलन्समधून शिवछत्रपती रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे डॉ. जाहिद हसन यांनी तपासणी करून दोन्ही मुलांचा सुमारे चार तासांपूर्वीच बुडून मृत्यू झाल्याची पुष्टी केली.

इनामदार कुटुंबावर दुःखाचा डोंगर

या दुर्घटनेने इनामदार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलांचे वडील पाच महिन्यांपूर्वी नोकरीसाठी दुबईला गेले असून घरातील जबाबदारी आई आणि आजीकडे होती. आफान तिसरीत तर रिफत पहिलीत शिकत होती. खेळायला गेलेली मुलं अचानक बेपत्ता होणे आणि नंतर मृत अवस्थेत सापडणे, हा अत्यंत वेदनादायक प्रसंग नातेवाईक सांगत आहेत.

घटनेची माहिती मिळताच रुग्णालय परिसरात मोठी गर्दी जमली होती. पोलिस निरीक्षक किरण अवचर, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण आणि संबंधित विभागातील कर्मचारी घटनास्थळी उपस्थित राहून शोधकार्य राबवत होते.

जुन्नर परिसरात या दुर्घटनेने हळहळ व्यक्त होत असून, परिसरात सावधगिरीचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now