
माजलगाव |
तालुक्यातील आदिवासी समाजातील तब्बल 31 वेठबिगारांची सुटका जिल्हा प्रशासन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जनसाहस यांच्या संयुक्त कारवाईत करण्यात आली. गेल्या तीन महिन्यांपासून या मजुरांकडून जबरदस्तीने काम करून घेतले जात असल्याची, तसेच त्यांच्यावर मारहाण व धमकी दिल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी केली होती. या तक्रारीनंतर तत्काळ हालचाल करत ही कारवाई राबविण्यात आली.
न्या. आनंद यावलकर (प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, बीड), जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, तसेच न्या. वाहब सय्यद (सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण) यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण मोहिम पार पडली.
कारवाईदरम्यान उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले, तहसीलदार संतोष रुईकर, अधिकार मित्र तत्त्वशील कांबळे, पोलिस निरीक्षक बालक कोळी, कामगार विभागाचे अजय लव्हाळे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व पीडितांची भेट
कारवाईनंतर सर्व 31 कामगारांची जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी भेट घेतली. त्यांची व्यक्तिगत समस्या जाणून घेतल्या तसेच शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली.
मुलांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. सर्व कामगार जळगाव जिल्ह्यातील असल्यामुळे तेथील जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधून मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
मोफत कायदेशीर मदतीचे आश्वासन
न्या. वाहब सय्यद यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्याशी संपर्क साधून या सर्व कामगारांना आवश्यक ते मोफत कायदेविषयक मार्गदर्शन आणि मदत मिळवून दिली जाईल, असे आश्वासन दिले.
या कारवाईमुळे वेठबिगारीच्या चंगळातून सुटलेल्या 31 कामगारांना नवजीवनाची नवी आशा मिळाली असून प्रशासनाने उचललेल्या त्वरीत पावलांचे सर्वत्र कौतुक होत आहे.