नवले पुलावर मृत्यूचा ‘कंटेनर’ : २५ वाहनांचा चुराडा, ८ जणांचा जागीच मृत्यू, भीषण दृश्यांनी थरकाप

पुणे | शहरातील मृत्यूचा पूल म्हणून प्रसिद्ध असलेल्या नवले पुलावर असा अपघात घडला. एका भरघाव कंटेनरने रस्त्यावरील जवळपास २० ते २५ वाहनांना धडक देत त्या 25 वाहनांचा चुराडा केला व तब्बल दोन किलोमीटर अंतरापर्यंत उध्वस्त करत फरफटत नेले . या अपघातात आतापर्यंत ७ ते ८ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समजलेले आहे, तर अनेक जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात घडला. प्रत्यक्षदर्शींच्या मते, कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यानंतर चालकाने वाहनाचा ताबा गमावला आणि समोर येईल त्या वाहनांना अक्षरशः उडवत पुढे जात राहिला. महामार्गावर क्षणार्धात भीषण गोंधळ उडाला.

अपघातानंतरचा दृश्य इतका भयावह होता की, अनेक गाड्या उलटल्या, काही वाहनं पेट घेतली. एका मारुती सुझुकी डिझायर कारचा चक्काचूर झाला आहे. कार इतकी चिरडली गेली की तिच्यातील प्रवाशांचा कोळसा झाला, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

भरधाव कंटेनर अखेर एका दुसऱ्या कंटेनरला धडकला, आणि त्यावेळी दोन्ही कंटेनरच्या मध्ये एक कार अडकली होती. त्या कारमध्ये ३ ते ५ प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. धडकेनंतर झालेल्या जोरदार स्फोटात दोन्ही कंटेनर आणि कारला आग लागली. काही सेकंदांतच तिन्ही वाहनं ज्वालांच्या भक्ष्यस्थानी गेली.

घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस तातडीने दाखल झाले असून, बचावकार्य सुरु आहे. अपघातामुळे पुणे-सातारा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दरम्यान, नवले पुलावरील सुरक्षाव्यवस्थेचा आणि वाहतूक नियंत्रणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

हा अपघात नवले पुलावर वारंवार घडणाऱ्या अपघातांची भीषण पुनरावृत्ती असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. स्थानिकांच्या मते, येथे कायमच वेगवान वाहनं, अरुंद वळणं आणि उताराचा भाग यामुळे धोका वाढतो. आजच्या घटनेनंतर प्रशासनावर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत आहे.
